Ads

चांदा क्लब ग्राउंड येथील मीना बाजार संचालकाला 50 हजार रुपयांचा दंड


Meena Bazaar Director at Chanda Club Ground fined Rs 50,000; Corona Violation
चंद्रपूर, ता. २ : शहरातील चांदा क्लब ग्राउंड येथे मागील महिनाभरापासून माऊली एकता मीना बाजारच्या वतीने हॅन्डलुम व कंजूमर एक्सपो मध्ये कोविड-19 विषयक वर्तणूक नियमांचे तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील तरतुदींचे पालन होत नसल्याचे तसेच परवान्यातील इतर अटी व शर्तीचा भंग होत असल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या अनुषंगाने मा. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशावरून गठित समितीने प्रत्यक्ष पाहणी करून चौकशी केली. त्यात मीना बाजारच्या संयोजकांकडून कोरोनाविषयक वर्तणूक नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. याप्रकरणी माऊली एकता मीना बाजार यांच्या विरोधात 50 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला.
चंद्रपूर येथील चांदा क्लब ग्राउंड येथे सुरु असलेल्या माऊली एकता मीना बाजार ठिकाणी १ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी साडेसात वाजता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये गठीत समितीने भेट दिली. या समितीमध्ये तहसीलदार निलेश गौंड, महानगरपालिकेचे उपायुक्त अशोक गराटे, महानगरपालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार, रामनगर पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक राधिका पाटील यांचा समावेश होता.

या भेटीदरम्यान मीना बाजार व्यवस्थापक भुषण गज्वी हे हजर नव्हते. त्यामुळे येथील उपस्थित त्यांचे प्रतिनिधी कलाम खान यांच्याशी तसेच मौत का कुवा खेळचे व्यवस्थापक तरबेज आलम यांच्याकडून माहिती घेण्यात आली. या ठिकाणी कोणतेही स्थायी कार्यालय आढळून आले नाही. तसेच व्यवस्थापक हजर नसल्यामुळे इथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत कोणताही अभिलेख आढळून आला नाही. मीना बाजारच्या प्रवेशद्वाराजवळ एक मुलगा हॅन्डसॅनिटायझर व मास्क वाटप करत असल्याचे निदर्शनास आले. या ठिकाणी जवळपास एक हजार ते बाराशेच्या वर लोक उपस्थित होते. परंतु सदर नागरिक गर्दीने आणि दाटीवाटीने नियमांचे पालन न करता वावरत असल्याचे दिसून आले. उपस्थित लोकांपैकी जवळपास 80 टक्के लोक मास्क न वापरता इथे वावरत असल्याचेही दिसून आले.

मीना बाजारच्या ठिकाणी विविध वस्तू व खाद्यपदार्थांच्या विक्रेत्यांचे 20 ते 25 स्टॉल, तसेच आठ ते दहा पाळणे, झुले व इतर खेळ प्रकार लावल्याचेही निदर्शनास आले. परंतु विक्रेते व व्यवस्थापक मास्क लावलेले नव्हते. त्यांच्याकडून कोविड-19 नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले. मीना बाजार ठिकाणी मीना बाजार व्यवस्थापनासाठी कार्यरत कर्मचारी यांच्याकडून कोविड-19 लसीबाबत प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात आले नाही. तसेच कार्यरत १० होमगार्ड यांनी लसीचा दुसरा डोस घेतल्याचे तोंडी सांगितले. परंतु त्यांच्याकडे प्रमाणपत्र उपलब्ध नव्हते. तसेच येथे कार्यरत पाच बाउन्सर यांना लसीकरण प्रमाणपत्र याबाबत विचारले असता त्यांनी लसीचा पहिलाच डोस घेतल्याचे सांगितले.

मीना बाजाराच्या ठिकाणी प्रवेशद्वार सोडून आतमध्ये कुठेही हॅण्ड सनीटायझर, साबण, पाणी, तापमापक इत्यादींची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. मीना बाजार ठिकाणी पाळणे, झुले, इतर खेळ साहित्य निर्जंतूक करण्याची कोणतीही व्यवस्था येथे उपलब्ध नव्हती. गर्दी टाळण्यासाठी व सामाजिक अंतर करण्याबाबत व कोविड प्रसार जनजागृती बाबत कोणतेही पोस्टर बॅनर किंवा लाउडस्पीकर मार्फत प्रचार करण्यात येत नसल्याचेही दिसून आले. मीना बाजारच्या ठिकाणी उपस्थित लोक हे अत्यंत गर्दीने दाटीवाटीने आणि सामाजिक अंतराचे पालन न करता असल्याचेही आढळून आले आहे.

त्यामुळे सर्रास उल्लंघन होत असल्याचा ठपका ठेवून 50 हजार रुपयांचा दंड महानगरपालिकेने आकारला आहे. सदर ठिकाणी कोविड प्रतिबंधक विषयक वर्तणूक नियमाचे उल्लंघन होत असल्याने सदर मेल्याची परवानगी रद्द करण्याची शिफारस समितीने केली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment