चंद्रपुर :- जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने चांगल्या समाज निर्मितीच्या दिशेने कौतुकास्पद काम केल्या जात आहे. ७५ वर्ष पूर्ण झालेल्या जेष्ठ नारिकांसाठी त्यांच्या तर्फे आयोजित करण्यात आलेले हे अमृत महोत्सव म्हणजे खऱ्या अर्थाने जेष्ठांनी आजवर विविध क्षेत्रात दिलेल्या सेवाचा सन्मान असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने रामनगर येथील जेष्ठ नागरिक संघाच्या सांस्कृतिक भवन येथे ७५ वर्ष पूर्ण झालेल्या जेष्ठांचा अमृत महोत्सव व सत्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी राष्ट्रपती पोलिस शौर्य पदकाने सन्मानित पोलिस अधिकारी तथा जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष महादेव पिंपळकर यांची अध्यक्षस्थानी तर समतावादी हिंदु धर्म परिषदेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश वाकुडकर, ओबीसी नेते तथा सामाजिक कार्यकर्ते अशोक जिवतोडे यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती.
यावेळी पूढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, कोणत्याही क्षेत्रात जेष्ठांच्या अनूभवी मार्गदर्शनाशिवाय यशस्वी वाटचाल करणे शक्य नाही. जेष्ठ नागरिक संघाच्या कार्यक्रमात मला वारंवार येण्याचा योग येतो हे माझे भाग्य आहे. जेष्ठ नागरिक संघाच्या कार्यक्रमांमध्ये आल्यावर आनंदासह काम करण्याची नवी ऊर्जा मिळते. जेष्ठांचे विचार आणि सूचना या अमुल्य असून त्या विचारात घेतल्या गेल्या पाहिजे, समाजानेही त्यांना योग्य वागणून दिली पाहिजे त्यांच्या सूचनांची दखल घेतली पाहिजे असे यावेळी बोलतांना ते म्हणाले, विकास कामांसह सामाजिक सलोखा व ऐक्य टिकवत समाजाची ओळख अबाधित ठेवण्याचे काम लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून झाले पाहिजे त्या दिशेने माझे प्रयत्न सुरु आहे. जेष्ठ नागरिक सुध्दा या समाजाचा एक महत्वाचा घटक आहे. जेष्ठ नागरिक संघाच्या विकासासाठी आपण २५ लक्ष रुपयांचा निधी दिला आहे. पूढेही शक्य ती मदत करण्याची माझी तयारी असल्याचेही ते यावेळी म्हणाले, आपआपल्या क्षेत्रात कामाच्या व्यस्ततेत जगत असतांना आतील कलागुण लुप्त होतात. मात्र निवृत्ती नंतर दळलेल्या कलागुणांना पून्हा पुनर्जीवित करण्याचे काम जेष्ठ नागरिक संघ करत आहे. जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने आयोजित या अमृत महोत्सवात जेष्ठांकडून करण्यात येत असलेले विविध कलांचे सादरीकरण मंत्रमुग्घ करणारे असून हे अमृत महोत्सव खऱ्या अर्थाने जेष्ठांच्या कलागुणांचा सन्मान करणारे एक हक्काचे व्यासपीठ आहे. असे आयोजन नियमित करण्यात यावे असेही ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला जेष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष केशवराव चौधरी, सचिव प्रा. माणिकराव अंधारे, सहसचिव देवराव सोनपितरे, कोषाध्यक्ष माणिकराव गहोकार, हिशोब तपासणिस विठ्ठल घुमडे यांच्यासह जेष्ठ नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
0 comments:
Post a Comment