गडचांदूर प्रतिनिधि:- केंद्र सरकार गोरगरिबांसाठी मोफत अन्नधान्य योजना राबवित असून अनेक ठिकाणी याचा लाभ सुद्धा मिळत आहे.असे असताना कोरपना तालुका अन्नपुरवठा विभाग मात्र याला अपवाद ठरत आहे.सदर विभाग अधिकारी व कर्मचाऱ्यांनी येथील कित्येक शिधापत्रिका धारकांना अक्षरशः वेठीस धरल्याचे चित्र असून याठिकाणी शासन योजनेला हरताळ फासला जात आहे.सरकारी स्वस्त धान्य मिळावे यासाठी तालुक्यातील अनेक गोरगरिबांनी नवीन रेशनकार्डसाठी अन्नपुरवठा विभागाकडे अर्ज केले.कार्ड मिळाले परंतु एक वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटुनही धान्य काही सुरू झाले नाही.यासाठी कित्येक जण तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवत असून पुरवठा अधिकारी,कर्मचारी नाना कारणे पुढे करून सबुरीचे सल्ले देत आहे.रेशनकार्ड हातात घेऊन कित्येक गोरगरीब,गरजवंत धान्य सुरू करण्यासाठी तहसील कार्यालयाचे हेलपाटे घालत असल्याचे विदारक चित्र असताना दलालांनी दिलेले कार्ड पटापट मार्गी लावले जात असल्याचे आरोप होत आहे.एकिकडे तालुक्यात ठिकठिकाणी महाराजस्व अभियान राबवून जनतेचे प्रश्न मार्गी लावले जात आहे तर दुसरीकडे नवीन रेशनकार्ड धारक कित्येक महिन्यांपासून धान्य सुरू होण्याची वाट पाहत आहे.पुरवठा विभागाच्या या अनागोंदी कारभारामुळे शासन योजनेपासून वंचित असणाऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली असतानाच लोकप्रतिनिधी या पासून अनभिज्ञ कसे ? हे मात्र कोडेच बनले आहे. अशाप्रकारे गोरगरिबांना वेठीस धरून नाहक त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधी वठणीवर का आणत नाही ? असे प्रश्न उपस्थित केले जात आहे.
अगोदरच कोरोनाच्या लाटेमुळे लोकांचे कंबरडे मोडले,व्यापार ठप्प झाले,अजूनही कित्येकांच्या हाताला व्यवस्थित काम नसल्याने आर्थिक घडी विस्कळली,परिवाराचे पालनपोषण कसे करायचे हा प्रश्न भेडसावत असताना पुन्हा तिसरी लाटेची शक्यता दिसत आहे.अशा परिस्थितीत येथील अन्नपुरवठा विभागाकडून गोरगरिबांची निव्वळ चेष्टा सुरू असून यांच्या मनमानी व सुस्त कारभारामुळे कोरोना महामारीत कित्येक नवीन रेशनकार्ड धारक शासन योजनेपासून वंचित आहे.अपेक्षेपेक्षा जास्त कालावधी लोटूनही धान्य सुरू न झाल्याने हल्लीच्या महागाईत जगावे की मरावे हेच कळेनासे झाले अशी जळजळीत भावना व्यक्त होत आहे.यांचा गलथान कारभार अनेकांच्या जिव्हारी लागला असून विनाकारण मनस्ताप सहन करावा लागत आहे.लोकप्रतिनिधी व संबंधित विभागाच्या वरिष्ठांनी ही समस्या लवकरात लवकर मार्गी लावावी,जनतेचा अंत पाहू नये अन्यथा संवैधानिक मार्गाने आंदोलन उभाण्याचा इशारा काही रेशनकार्ड धारकांनी दिला आहे.जनतेच्या या समस्येकडे संबंधित लक्ष देतील का,हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
0 comments:
Post a Comment