भद्रावति तालुका प्रतिनिधी:- खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषीवकेंद्र चालक जादा भावाने खते, बियाणे, कीटकनाशकांची विक्री करतात. दुकानबाहेर दरफलक लावत नाही. उगवण प्रमाणपत्र नसलेल्या खते, बियाण्यांची विक्री करतात. हे प्रकार थांबविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने तालुकास्तरावर कृषी केंद्र चालकांची बैठक घेणे सुरू केले आहे. बुधवारी भद्रावतीत कृषी विभागाने कृषी केंद्र चालकांची बैठक घेतली. त्यांना आवश्यक त्या सूचना केल्यात. जादा दराने खते, बियाणे, कीटकनाशकांची विक्री केल्यास परवाने निलंबित करण्यात येईल, अशी ताकीद दिली.
खरीप हंगामाला आता सुरुवात होत आहे. हंगामासाठी कृषी विभागाने तयारी सुरू केली आहे.तालुकास्तरावरील कृषी केंद्रचालकांची बैठक घेणे सुरू केले आहे. बुधवारी (ता. ४) भद्रावती पंचायत समितीच्या सभागृहात कृषी केंद्र चालकांची बैठक पार पडली. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे प्रभारी कृषी विकास अधिकारी लक्ष्मीनारायण दोडके, उपविभागीय कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे, जिल्हा गुण नियंत्रण प्रशांत मडावी, मोहीम अधिकारी सुशांत गाडेवार, बीडीओ श्रीकांत बोबडे, तालुका कृषी अधिकारी मोहीनी जाधव, श्रीकांत पिसे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी कृषी केंद्र चालकांना खताचा साठा, स्टॅाक, दराप्रमाणे खते, बियाणे, कीटकनाशकांची विक्री करू नये. एमआरपीप्रमाणे विक्री करावी. जादा दर, अनियंत्रित विक्री, उगवण प्रमाणपत्र नसलेले बियाणे, खत, कीटकनाशकांची विक्री केल्यास परवाने निलंबित करण्यात येतील, अशी ताकीद प्रभारी कृषी विकास अधिकारी लक्ष्मीनारायण दोडके यांनी दिली. सोयाबीन, कापसाची उगवणक्षमता तपासूनच विक्री करावी. उगवण क्षमता तपासल्यानंतरच पेरणी करण्याचा सल्ला त्यांनी शेतकऱ्यांना दिला.
0 comments:
Post a Comment