चंद्रपूर : दुर्गापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या तुळशीनगरमध्ये सतत दोन दिवसामध्ये दोन घर चोरट्यांनी फोडले आहे. या घरफोडीमुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली असून मागील आठ ते दहा वर्षापूर्वी पडलेल्या दरोड्याच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहे. दुर्गापूर पोलिसांनी या परिसरात गस्त वाढवून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.
चंद्रपूर-नागपूर रोडवरील उर्जानगरकडे जाणाऱ्या रोडलगत तुळशीनगर वसहात आहे. या परिसरामध्ये मागील काही दिवसांपासून चोरट्यांनी धुळाकुळ सुरू केला आहे. दरम्यान, १४ आणि १५ ऑगस्टच्या रात्री घरमालक बाहेरगावी गेल्याचे बघून चोरट्यांनी हात साफ केले आहे. यामध्ये चांदेकर कुटुंबीय १४ ऑगस्टरोजी बाहेरगावी गेले होते. हिच संधी साधून चोरट्यांनी त्याचे घर फोडले तर याच दरम्यान, कुंभारे यांच्या घरीही चोरट्यांनी हात साफ केला. या घटनेची माहिती दुर्गापूर पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी पंचनामा केला.
----------
गस्त वाढविण्याची मागणी
मागील काही वर्षापूर्वी या वार्डामध्ये मोठा दरोडा पडला होता. या दरोड्याची दहशत अजूनही नागरिकांमध्ये आहे. त्यातच आता चोरीचे सत्र सुरु झाले आहे. सलग दोन दिवसात दोन चोऱ्या झाल्या आहे. त्यामुळे दुर्गापूर पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
----
पोलिसांच्या उत्तराने नागरिक हैरान
'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय'' हे पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. असे असतानाही चोरी झाल्यासंदर्भात दुर्गापूर पोलीस स्टेशनमध्ये वार्डातील नागरिकांनी फोन केला असता प्रथम तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये या नंतरच येऊ, असे उत्तर मिळाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला गेला. नागरिकांची सुरक्षा असलेल्या पोलिसांकडून असे उत्तर मिळणे अपेक्षित नव्हते. त्यानंतर नागरिकांनी ११२ क्रमांकावर फोन करून घटनेची माहिती देण्यात आली.
0 comments:
Post a Comment