भद्रावती:- "माणसाने देव मानावा की नाही मानावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण सर्वांनाच दैव मानावे लागते. हे दैव हुलकावणी देणार असतं. म्हणून मानवी जीवन सुंदर असतं. दैव नावाची गोष्ट दिसत नसली तरी ती प्रत्येकाला अनुभवता येते. मानवी जीवनात ज्या ज्या गोष्टींचा आपण विचार करतो. त्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडतातच असे नाही नेमके हेच महायोगी अरविंदांच्या आयुष्यात झाले" असे विचार लोकसेवा शिक्षण संस्था, वरोरा चे अध्यक्ष तथा सेवानिवृत्त प्राध्यापक प्रा. श्रीकांत पाटील यांनी व्यक्त केले.
ते भद्रावती येथील विवेकानंद महाविद्यालयात योद्धा संन्याशी स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय पालक - मित्र मंडळाच्या वतीने आयोजित "श्री अरविंद यांचे जीवन व कार्य" या विषयावर प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे होते. मंचावर पुरुषोत्तम मत्ते, प्रा. धनराज आस्वले उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रा पाटील पुढे म्हणाले की, "माझं जीवन माझ्यासाठी नाही तर इतरांसाठी आहे असे महायोगी श्री अरविंदांना वाटत होते. त्यामुळे इतरांचे आयुष्य प्रकाशमान करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले असल्याचे त्यांनी सांगितले.अध्यक्षस्थानाहून बोलताना प्राचार्य डॉ. उमाटे यांनी स्वामी अरविंद यांचा जीवनपट सविस्तर मांडला. यावेळी योद्धा संन्याशी स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय पालक मित्र मंडळाचे अनेक कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक,वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक प्रा. रमेश पारेलवार यांनी केले. आभारप्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
0 comments:
Post a Comment