भद्रावती तालुका प्रतिनिधि: भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत धाडसी चोरी होऊन ८ लाख रोख रकमेसह १३ लाख रुपये किमतीचे सोने लंपास करण्याची घटना सोमवारी रात्री घडली.
प्राप्त माहितीनुसार, चंदनखेडा येथे विदर्भ कोकण ग्रामीण बँकेची शाखा आहे. या शाखेत सोमवारी रात्री १२ वाजेनंतर दोन अज्ञात चोरटे तोंडाला कापड बांधून आले. त्यांनी प्रथम गॅस कटरच्या साह्याने बँकेची खिडकी तोडून आत प्रवेश केला. सीसीटीव्ही कॅमेरे असल्याचे लक्षात येताच त्यांनी त्या कॅमेऱ्यांची तोडफोड करून वायर तोडून टाकले. त्यानंतर गॅस कटरच्या साह्याने तिजोरी फोडून त्यातील ८ लाख रुपये रोख व १३ लाख रुपये किमतीचे सोने असा एकूण २१ लाख रुपये किमतीचा ऐवज नेला.
दरम्यान, मंगळवारी सकाळी कर्मचारी बँकेत कर्तव्यावर आले असता त्यांना खिडकी तुटलेली व सामान अस्ताव्यस्त पसरलेले दिसले. अधिक चौकशी केली असता चोरीझाल्याचे आढळून आले. त्यामुळे बँकेचे व्यवस्थापक फुलझेले यांनी भद्रावती पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली व घटनास्थळी दाखल झाले. श्वान पथक, ठसे तज्ज्ञ, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग यांना पाचारण करण्यात आले. श्वान पथकाने बँकेपासून काही अंतरापर्यंत मार्ग दाखविला. चोरटे चोरी करून शेतातून पळून गेले.
दरम्यान, घटनास्थळाला जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, वरोडा उपविभागीय पोलिस अधिकारी आयूष नोपानी आणि भद्रावती पोलिस स्टेशनचे ठाणेदार गोपाल भारती यांनी भेट दिली असून, पोलिस तपास सुरू आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी चोरा येथील मध्यवर्ती सहकारी बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र या दोन्ही बँकांमध्ये चोरीचा अयशस्वी प्रयत्न झाला होता. चोरा गावातील काही युवक रात्री २ वाजताच्या सुमारास एका कार्यक्रमावरून परत येताना दिसताच चोरटे पळून गेले होते.
0 comments:
Post a Comment