चंद्रपूर - गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यांत आदिवासी समाजातील अनेक थोर पुरुषांचे योगदान आहे. परंतु भाजप गोंडवाना विद्यापीठाची गुणवत्ता न वाढविता संघ पुरस्कृत व्यक्तींची नावे देऊन आदिवासी समाजातील महात्म्यांचा अवमान करीत आहे, असा आरोप खासदार बाळू धानोरकर यांनी केला होता. गोंडवाना विद्यापीठाला वीर बिरसा मुंडा यांचे नाव न दिल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. खासदार धानोरकर यांच्या आंदोलनाच्या धस्क्याने गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु नरमले. विद्यापीठाच्या सभागृहाला डिडोळकरांचे नाव देण्याच्या ठरावाला त्यांनी स्थगिती दिली आहे.
गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या सभागृहाला नागपूर विद्यापीठाचे पूर्व व्यवस्थापन परिषद सदस्य स्व. दत्ता डिडोळकर यांचे नाव देण्याचा ठराव घेण्यात आला. या ठरावाचे तीव्र पडसाद उमटले होते. आदिवासी समाजाच्या संघटनांनी विरोध केला. काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली होती. गोंडवानाच्या नवनिर्मित सभागृहाला थोर स्वातंत्र्यसेनानी शहीद बिरसा मुंडा यांचे नाव आणि विद्यापीठ परिसरात शहीद क्रांतीसूर्य बाबूराव शेडमाके यांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा, अशी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी केली होती. आदिवासी बहुल जिल्ह्यातील गोंडवाना विद्यापीठाला आदिवासी समाजातील व्यक्तींचे नाव देण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे ही लाजीरवाणी बाब असल्याचेही त्यांनी म्हटले होते. आदिवासी नेते आणि स्वातंत्र्यसेनानी बिरसामुंडा यांनी ब्रिटिशांविरुद्ध तीव्र लढा दिला. ते एकमेव आदिवासी प्रमुख आहेत. ज्यांचे चित्र संसद भवनात लागले आहे. वयाच्या २४ व्या वर्षी हौतात्म्य पत्करलेल्या वीर बिरसा मुंडा यांचे नाव गोंडवाना विद्यापीठाचे सभागृहाला द्यावे अन्यथा तीव्र आंदोलन करू, असे धानोरकर म्हणाले. स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात अमर शहीद क्रांतीसुर्य बाबुराव शेडमाके यांचे बलिदान विसरता येणार नाही.त्यामुळे या महापुरुषांची नव्या पिढाली माहिती असणे आवश्यक आहे. जिल्ह्यात या हुतात्म्यांचे मोठे स्मारक नाही. विद्यापीठ परिसरात त्यांचा पुर्णाकृती पुतळा उभारल्यास नवीन पिढीला त्यांच्या बलिदानाचे स्मरण राहणार आहे. मागणी तत्काळ पूर्ण करावी अन्यथा आंदोलन करु असा इशारा खासदार धानोरकर यांनी दिला. खासदार बाळू धानोरकर यांच्या आंदोलनाच्या धस्क्याने गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॅा. प्रशांत बोकारे नरमले. विद्यापीठाच्या सभागृहाला डि़डोळकरांचे नाव देण्याच्या ठरावाला त्यांनी स्थगिती दिली आहे.
0 comments:
Post a Comment