चंद्रपूर : येथील वनविकास व्यवस्थापनातील ४० ते ५० वनमजूर व कंत्राटी कामगार येथे मागील अनेक वर्षांपासून काम करीत आहे. परंतु, १० वनकामगार आणि २५ कंत्राटी कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता वनअधिकाऱ्यांनी त्यांना कामावरून कमी केले आहे. तर दुसरीकडे काही नवीन कामगारांना कामावर घेण्यात येत आहे. हा जुन्या कामगारांवर अन्याय असून, कामावरून कमी केलेल्या कामगारांना पूर्ववत कामावर घेण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा इंटक व सिटू संलग्नित वनमजूर व कंत्राटी कामगार निवारण संघर्ष समितीने चंद्रपूर श्रमिक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे.
आठ ते नऊ वर्षांपासून काम करणाऱ्या कामगारांना वनरक्षकाने ३१ऑक्टोबर रोजी बैठक घेत १ नोव्हेंबरपासून कामावर येऊ नका असे आदेश दिले. २५ कामगार कामावरून कमी करण्यात आले असून,पुढील आठवडाभरात आणखी कामगारांना कमी करण्यात येईल, असे यावेळी या कामगारांना सांगण्यात आले. तर दुसरीकडे नवीन कामगार कामावर घेतले जात आहे. जुन्या कामगारांना कामावरून कमी करून नवीन कामगार घेणे अन्यायकारक असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे. दरम्यान, संघटनेने संचालक रेड्डी व उपसंचालक यांची भेट घेत कामावरून कमी करण्यात येऊ नये अशी मागणी केली. परंतु, अद्याप कामगारांना कामावर पूर्ववत घेण्यात आलेनाही. त्यामुळे वनअधिकारी तसेच बीवीजी कंपनीच्या विरोधात कामगारांमध्ये रोष आहे. कामावरून कमी केेलेल्या कामगारांना ९ नोव्हेंबरच्या आत कामावर न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला. पत्रकार परिषदेला संघर्ष समितीचे अध्यक्ष कॉम्रेड वामन बुटले, सचिव नेताई घोष, ॲड. सुनीता पाटील यांच्यासह कामगारांची उपस्थिती होती.
0 comments:
Post a Comment