Ads

अयोध्येत रामलला मूर्ती प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूरात अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन

चंद्रपूर : श्रीरामजन्मभूमी स्थळी उभारलेल्या भव्य दिव्य मंदिरात श्री रामललाच्या मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी पवित्र अयोध्या नगरी सज्ज झाली आहे. संपूर्ण विश्व या ऐतिहासिक क्षणाची वाट बघत असताना चंद्रपूर शहर आणि जिल्हादेखील तयारीला लागला असून 20 ते 22 जानेवारी 2024 या तीन दिवसांत भरगच्च आणि वैविध्यपूर्ण कार्यक्रमांद्वारे चंद्रपूरकर रामभक्त नागरिक प्रभू श्रीरामाची आराधना करणार आहेत; विशेष म्हणजे यानिमित्त 20 जानेवारी रोजी एक मोठा विश्वविक्रम चंद्रपुरात नोंदविला जाणार असून "गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड" मध्ये याची नोंद होण्याची शक्यता आहे. यासाठी राज्याचे वन सांस्कृतिक कार्य व मत्स्यपालन मंत्री व पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रमांची जय्यत तयारी सुरू झाली आहे.A unique event was organized in Chandrapur on the occasion of Ramla idol installation in Ayodhya
घनदाट आणि वैभवशाली वनसंपदा, सर्वाधिक वाघ आणि विपुल खनिज संपत्ती असलेला चंद्रपूर जिल्हा सतत स्वतःचे वेगळेपण जोपासून आहे; श्रीराम जन्मभूमीवर उभारण्यात आलेल्या कोट्यवधी कारसेवकांच्या व रामभक्तांच्या स्वप्नातील भव्य राम मंदिराशी चंद्रपूरचे भावनिक नाते जोडले गेले आहे. या मंदिराच्या गर्भगृहाकरीता लागलेले काष्ठ (सागवान) चंद्रपूर-गडचिरोली च्या वन क्षेत्रातून गेले आहे. 29 मार्च 2023 रोजी सुमारे 3000 क्यूबिक फूट काष्ठ भव्य शोभायात्रेसह अयोध्येकडे रवाना झाले; यासाठी चंद्रपूरची जनता खरंच भाग्यवान आहे, याच पार्श्वभूमीवर राममूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यापूर्वी आम्ही काही तरी आगळी वेगळी व विक्रमी सेवा देण्याचा संकल्प केला असून चांदा क्लब ग्राउंड यासाठी सज्ज करण्यात येत असल्याची माहीती पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

ना.सुधीर मुनगंटीवार म्हणाले कि, २२ जानेवारी 2024 रोजी अयोध्येत श्री राम जन्मभूमीवर साकार झालेल्या भव्य राममंदिरात श्री रामललांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा संपन्न होताना प्रभू श्रीरामाची ही महापूजा संपूर्ण जग बघणार आहे ; याच निमित्ताने चंद्रपूर जिल्ह्याला सुद्धा जगाच्या नकाशावर मानाचे स्थान मिळवून देण्याचा आपला प्रयत्न आहे.

दिवाळी उत्सवात आपण ज्या मातीच्या पणत्यांनी घरदारं उजळून टाकतो, त्याचं हजारो पणत्यांनी, चंद्रपूरमध्ये चांदा क्लब ग्राउंडवर हजारो रामभक्त नागरिक एकत्र येऊन जगातले सर्वात मोठे "वाक्य" तयार करणार आहेत.
रामभक्तांच्या साक्षीने रामरायाची अयोध्येत प्रतिष्ठापना होणार आहे; तो सुवर्णक्षण अगोदरपासूनच वाजतगाजत साजरा करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो रामभक्त *20 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता* चांदा मैदानावर शिस्तबद्ध रीतीने अंथरलेल्या हजारो पणत्यांच्या सहाय्याने *"सियावर रामचंद्र की जय "* हा अकरा अक्षरी मंत्र लिहिणार आहेत; हजारो पणत्यांनी सजवलेले हे भव्यदिव्य रामनाम आकाशातून अविस्मरणीय दिसणार आहे.

चंद्रपूर येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालयाने या आगळ्या वेगळ्या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. या अतिविशाल उपक्रमाची गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड्सने नोंद घ्यावी अशी तयारी सुरू आहे.

गिनिसने हा "ऑफिशियल अटेम्प्ट" करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे या उपक्रमाचे परीक्षण करण्यास २० जानेवारी रोजी सायंकाळी चंद्रपूर येथे गिनिस रेकॉर्ड ची टीम प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत.

20 जानेवारीला, गिनीसच्या जवळपास दोनशे अवघड नियमांची पूर्तता करण्यात जर हा उपक्रम यशस्वी ठरला तर या भव्यदिव्य उपक्रमाची नोंद १८० हुन अधिक देशांत कार्यरत असणाऱ्या गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये होईल, भारताच्या नावावर अजून एक जागतिक विश्वविक्रम नोंदवला जाईल आणि रामपणत्यांचा हा प्रकाश आणि रामनामाचा जयघोष जगभरात मानाने आणि अभिमानाने दुमदुमेल असा विश्वास ना. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे .

*सांस्कृतिक कार्य विभागाकडून 21 आणि 22 ला आकर्षक कार्यक्रम*

सुप्रसिद्द अभिनेता पुनित इस्सर (महाभारतातील दुर्योधन) यांच्या *रामायण* या नाटकाचा प्रयोग दिनांक 21 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता होणार आहे. हे नाटक अति भव्य स्वरूपाचे असून यामध्ये 50 पेक्षा जास्त कलाकार काम करत आहेत. रामायणातील अनेक महत्त्वाच्या प्रसंगावर आधारित हे नाटक आहे. मुख्यतः राम आणि रावण यांच्यामधील संवाद व संघर्ष यामध्ये ठळकपणे दिसून येतो.

दिनांक 22 जानेवारी रोजी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणात येणार आहे. यामध्ये सुप्रसिद्ध कोरिओग्राफर सुभाष नकाशे हे दीडशे ते 200 कलाकारांना घेऊन रामायण संबंधित सादरीकरणे करणार आहेत. यामध्ये नृत्य, नाट्य, गीत गायन, वादन यांचा समावेशt असणार आहे. गदिमा व बाबूजी यांच्या अविष्कारातून साकार झालेल्या गीत रामायण मधील काही गाणी व त्यावर आधारित सादरीकरणे ही यावेळेस अनुभवता येणार आहे. प्रभू रामाशी संदर्भातील गाणी आणि गीत रामायणातील काही महत्त्वाची गीते घेवून व रामायणातील काही प्रसंगावर आधारित प्रसंग सादरीकरण होणार आहे.

या कार्यक्रमाची सुरुवात *राम जन्म* अर्थात पाळणा गीताने होईल तर शेवट *राम अयोध्यात परतल्यानंतर झालेला जल्लोष* आणि राज्याभिषेक दाखवण्यात येईल.

याच कार्यक्रमांमध्ये *अनुराधा पॉल* या विख्यात महिला तबलावादक व त्यांचा चमू रामायणातील काही प्रसंगावर गीत सादरीकरण करणार आहेत.

कार्यक्रमाची सांगता *जिल्हा व महानगर भाजपाच्या वतीने* २२ जानेवारी रोजी *"फायर शो"* ने होणार असून या सर्व कार्यक्रमात चंद्रपूरच्या नागरिकांनी उत्साहाने सहभागी व्हावे असे आवाहन ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

7 जटायू ताडोबात मुक्त करणार !

श्रीराम जन्मभूमी येथे अयोध्येत रामरायांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे या पार्श्वभूमीवर रामायणात उल्लेख असलेल्या जटायू अर्थात गिधाड संवर्धनाच्या दृष्टीने ताडोबा जंगलातील झरी परिसरात जटायु मुक्त करण्यात येणार असल्याची माहिती ना. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी दिली. 21 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजता झरी येथे हा कार्यक्रम होईल.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment