(सादिक थैम)वरोरा : शहरातील विविध भागात काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. काही दुकान बंद तर काही घरी कोणीही नसल्याची संधी साधून चोरटे आपल्या कारवाईला अंतिम रूप देत असल्याचे दिसत आहेत.
वरोरा शहरातील व्होल्टास सागर कॉलनी लगतच्या गुरुदेव नगर मधील तीन कुटुंब कामा निमित्त गावाबाहेर गेले होते. त्यामुळे त्यांची घरे कुलूप बंद होती. ही संधी साधून १३ मे रोजी मध्य रात्री नंतर एक ते तीन वाजताच्या सुमारास चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला असावा असा अंदाज आहे. चोरट्यांनी अशोक पाकमोडे यांच्या घरात प्रवेश करून २४ हजार रुपयांची रोख रक्कम आणि लहान मुलांचे चांदीचे दागिने लंपास केले. तर चंपत बूच्चे या सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरातून सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे सांगितले जाते. तसेच वसंत लोडे यांच्या घरून मात्र रिकाम्या हातानेच चोरट्यांना परतावे लागले.
यासंदर्भातील पोलीस तक्रारीनंतर चंद्रपूर येथील फॉरेन्सिक टीम आणि ठसे तज्ञांना प्राचारण करण्यात आले होते. सोमवार रोजी रात्री आठवडी बाजारातील एक किराणा दुकान फोडून तीन हजार रुपये रोख,३ तेल पिपे आणि किराणा साहित्य, मटन विक्री करणाऱ्या दुकानातून सत्तुर, सुरा आणि त्यांना धार लावण्याचा दगड चोरट्यांनी लंपास केले. आणखी दोन चिकन सेंटर मधून अशाच प्रकारचे साहित्य चोरट्यांनी पळवल्याचे सांगितले जाते. तसेच परिसरातील एका भंगार खरेदीच्या दुकानातून तांब्याचे साहित्य चोरट्यांनी पळवले . परंतु यापैकी कोणीही पोलीस तक्रार दिलेली नाही हे विशेष. याच दरम्यान मंगळवार रोजी शहरातील यात्रा मैदानामध्ये असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्यात चोरीची घटना घडली. तर दोन दिवसापूर्वी बोर्डा चौकातील अलमस्त यांच्या हार्डवेअर दुकानात चोरट्यांनी मागच्या दारातून प्रवेश करून ५० हजार रुपये रोख रक्कम पळवल्याची माहिती आहे. चोरी आणि घरफोडीच्या सततच्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
0 comments:
Post a Comment