चंद्रपुर :-आमदार किशोर जोरगेवार यांनी सीएसटीपीएस येथील 103 सुरक्षा रक्षकांची मुंबई येथे कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्यासोबत बैठक घडवून आणली होती. या बैठकीत सदर सुरक्षा रक्षकांची महानिर्मितीमध्ये होणाऱ्या भरती प्रक्रियेत सरळ भरती करण्याचे आदेश कामगार मंत्र्यांनी दिले होते. त्यामुळे लवकरच हे सर्व सुरक्षा रक्षक पुन्हा कामावर रुजू होणार असून, या सुरक्षा रक्षकांनी आज कार्यालयात आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेत सत्कार केला आहे.
यावेळी कामगार संघटनेचे बाबु जावळे, समीर पठाण, राजेश गायकवाड, संजय नागपूरे, शरद मंचलवार, यंग चांदा ब्रिगेडच्या नेत्या सायली येरणे, बंगाली समाज महिला शहर प्रमुख सविता दंढारे, माया पटले, करण नायर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
2015 मध्ये चंद्रपूर-गडचिरोली जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ येथे 103 सुरक्षा रक्षकांची नोंदणी करण्यात आली होती. मात्र, सदर नोंदणी अवैध असल्याचे सुरक्षा रक्षकांना सांगण्यात आले. त्यानंतर 2016 मध्ये संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि 103 सुरक्षा रक्षक यांच्यामध्ये बैठक घेण्यात आली. या बैठकीत नोंदित 103 सुरक्षा रक्षकांची नोंदणी वैध ठरविण्यात आली. त्यानंतर, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, चंद्रपूर यांच्याकडून मैदानी आणि शारीरिक चाचणी घेण्याचे ठरविण्यात आले. परंतु, तांत्रिक कारणांमुळे चाचणी पुढे ढकलण्यात आली. पुढील चाचणीसाठी तारीख लवकर देण्यात येईल असे संबंधित विभागाकडून सुरक्षा रक्षकांना कळविण्यात आले, मात्र आदेश काढण्यात आलेला नव्हता. त्यामुळे सदर सुरक्षा रक्षक बेरोजगार झालेले होते.
आमदार किशोर जोरगेवार यांनी याचा गांभीर्याने विचार करून सदर सुरक्षा रक्षकांना कामावर घेण्याची मागणी केली होती. मागणीच्या पूर्ततेसाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू केला होता. परिणामी मुंबई येथील मंत्रालयात कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी संबंधित विभागाच्या अधिकार्यांची बैठक बोलावली. महानिर्मितीला 250 सुरक्षा रक्षकांची गरज आहे. या भरती प्रक्रिये दरम्यान नोंदणीकृत 103 सुरक्षा रक्षकांना प्राधान्य देत त्यांना सरळ सेवेत घेण्यात यावे, असे आदेश त्यांनी या बैठकीत दिले होते. आता लवकरच हे सर्व कामगार कामावर रुजू होणार आहेत. आमदार किशोर जोरगेवार यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे जवळपास 9 वर्षांची कामगारांची बहु प्रतीक्षा संपली आहे. त्यामुळे या सर्व कामगारांनी आज शुक्रवारी कार्यालयात आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेत त्यांचा सत्कार केला.
यावेळी बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले की, "हा विजय कामगार आणि कामगार संघटनेच्या जिद्दीचा आहे. आपण एकजुटीने राहिलो, त्यामुळे आपल्याला हे यश मिळाले आहे. आपण सदैव कामगारांसोबत आहोत. आपल्याला न्याय मिळवून देता आला याचा नक्कीच आनंद आहे. आता आपण लागणारी सर्व कागदपत्रे तयार ठेवावीत. जिथे गरज भासेल तिथे मी तुमच्यासोबत उभा राहील." असे ते यावेळी बोलताना म्हणाले. या कार्यक्रमाला सुरक्षा रक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
0 comments:
Post a Comment