वरोरा : राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबांना त्यांच्या आजाराच्या उपचारासाठी सहाय्य उपलब्ध करून देणे, हा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजनेचा मुख्य उद्देश आहे. यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाची स्थापना करून "आरोग्य वारी, आली आपल्या दारी" उपक्रमांतर्गत 'राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात “ना वशिला, ना ओळख थेट मदत" अंतर्गत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षामधून केवळ २ वर्षात गरजू रुग्णांना तीनशे कोटींच्या पुढे वैद्यकीय मदत वितरित केली. त्यामुळे ३६ हजार रुग्णांचे प्राण वाचले. राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष आशेचा किरण ठरत असल्याची माहिती शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख तथा राज्य संयोजक रामहरी राऊत यांनी वरोरा येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
Chief Minister's Medical Aid Room for financially poor patients in the state is a ray of hope- Ramhari Raut
ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षामधून वेगवेगळ्या आजारांना अर्थसहाय्य केले जाते व हे सर्व निःशुल्क आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता मदत मिळविण्यासाठी मुंबईत मंत्रालयात जाण्याची देखील गरज नाही. ऑनलाईन अर्जावर रुग्णांना मदत मिळत असून यासाठी 8650567567 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करुन थेट आपल्या मोबाईलवर अर्ज मिळवता येत असल्याचे त्यांनी सांगितले. न वशिला, ना ओळख थेट मदत मिळते त्यामुळे कोणत्याही मध्यस्थांच्या मार्फत अर्ज करू नये तसेच यासाठी कुठल्याही खाजगी व्यक्ती किंवा संस्थेसोबत आर्थिक देवाणघेवाण करु नये, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी शिवसेना (शिंदे) पक्षाचे चंद्रपूर जिल्हा प्रमुख नितीन मत्ते यांनी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख रामहरी राऊत व त्यांच्या टीमचे स्वागत केले. संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्वाकांक्षी योजना " मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा " लाभ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गरीब रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन केले. चंद्रपूर जिल्ह्यात कर्करुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ते एक प्रकारे' कॅन्सर हब' बनत चालले आहे. याकडे गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे. जिल्हात सिकलसेल रुग्णांचे प्रमाण अधिक आहे, त्यामुळे या योजनेत सिकलसेल आजाराचा समावेश व्हावा. वरोरा तालुक्यासाठी रक्तपेढी व मोठी रुग्णवाहिकेची गरज असल्याचे मत त्यांनी मांडले. पत्रकार परिषदेत प्रवीण शर्मा (नागपूर), चंद्रशेखर चट्टे, शशीकांत नाकाडे, कपना भुसारी, आशिष ठेंगणे, विलास परचाके, कमलाकांत कळसकर, सिंगलदीप पेंदाम, मदन चिकवा, भूषण बुरीले, राजेश खंगार आदीं उपस्थित होते.
कोणत्या उपचारासाठी मिळते मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षामधून वेगवेगळ्या आजारांना अर्थसहाय्य केले जाते. त्यात कॉकलियर इम्प्लांट, हृदय प्रत्यारोपण, यकृत प्रत्यारोपण, किडनी प्रत्यारोपण, फुफ्फुस प्रत्यारोपण, बोन मॅरो प्रत्यारोपण, हाताचे प्रत्यारोपण, हिप रिप्लेसमेंट, कर्करोग शस्त्रक्रिया, अपघात शस्त्रक्रिया, लहान बालकांचे शस्त्रक्रिया, मेंदूचे आजार, हृदय रोग, डायलिसिस, कर्करोग किमिथेरपी / रेडिएशन, खुब्याचे प्रत्यारोपण, नवजात शिशुचे आजार, गुडघ्याचे प्रत्यारोपण, बर्न रुग्ण, विद्युत अपघात रुग्ण आणखी ५ आजाराचा यात समावेश करता येणार आहे.
0 comments:
Post a Comment