(प्रशांत गेडाम)सिंदेवाही :- महसूल विभाग अंतर्गत सरडपार येथील तलाठी साज्यामध्ये कोतवाल म्हणून कार्यरत असणारे नंदकिशोर हिरामण खोब्रागडे हे मागील सहा दिवसांपासून आपल्या राहत्या घरून गायब झाले असून भाऊ संजय हिरामण खोब्रागडे यांचे तक्रारी नुसार सिंदेवाही येथील संशयित आरोपी डॉ.नामदेव धनविजय यांना सिंदेवाही पोलिसांनी अटक केली आहे. तर दोन संशियत अनोळखी आरोपी पुढे आले आहे असल्याने सिंदेवाही पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे.
सिंदेवाही तालुक्यातील मौजा विरव्हा येथील मूळचे रहिवासी असलेले नंदकिशोर हिरामण खोब्रागडे हे सरडपार येथील तलाठी साझ्यामध्ये कोतवाल म्हणून कार्यरत आहेत. ते सिंदेवाही येथील मदनापुर वॉर्डात आपल्या परिवारासह भाड्याने राहतात. प्राप्त माहितीनुसार १२ सप्टेंबर या दिवशी कोतवाल नंदकिशोर खोब्रागडे यांचेकडे काही कामाच्या निमित्ताने दोन अनोळखी व्यक्ती आले. व काहीवेळाने नंदकिशोर यांना घेऊन बाहेर गेले. मात्र रात्री पर्यंत ते घरी पोहचले नाही. म्हणून आई आणि मुलगी यांनी इकडे तिकडे नंदकिशोर यांची चौकशी केली. मात्र नंदकिशोर रात्रभर घरी आले नाही. दुसऱ्या दिवशी भाऊ संजय हिरामण खोब्रागडे यांनी नंदकिशोर खोब्रागडे हे घरून गायब असल्याची सिंदेवाही पोलिसांत तक्रार दाखल केली. मात्र नंदकिशोर यांचा काहीच थांगपत्ता न लागल्याने नंदकिशोर यांचा घातपात झाला असल्याचा संशय कुटुंबीयांना आला. त्यामुळे भाऊ संजय यांनी नंदकिशोर खोब्रागडे यांना घातपात झाला असावा असा अंदाज बांधून यामागे सिंदेवाही येथील डॉ. नामदेव धनविजय यांचा हात असल्याचा संशय घेऊन याबाबतची तक्रार सिंदेवाही पोलिसांत दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सिंदेवाही पोलिसांनी अपराध क्रमांक ३४८/२०२४ कलम १४० (३), ३ (५) भा.न्या.स नुसार गुन्हा दाखल करून संशयित आरोपी म्हणून डॉ.नामदेव धनविजय यांना सिंदेवाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच दोन अनोळखी संशयित पुढे आले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पुढील तपास सिंदेवाही पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय राठोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर महले पुढील तपास करीत आहेत.
0 comments:
Post a Comment