चंद्रपुर :-भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गोंडवाना विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाच्या वतीने संविधान सन्मान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचा उद्घाटन समारंभ येत्या रविवारी, २२ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता चंद्रपूर येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहात होत असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांनी येथे दिली.
Inauguration of Constitution Honor Festival in Chandrapur on Sunday
सरदार पटेल महाविद्यालयाच्या सभागृहात गुरूवारी सायंकाळी आयोजित पत्रपरिषदेत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद काटकर यांच्यासह विद्यापीठाचे सिनेट सदस्य दिलीप चौधरी, डॉ. मिलिंद भगत, निलेश बेलखेडे, डॉ. शिला नरवाडे, संजय रामगिरवार आदी उपस्थित होते.
महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे राहणार असून, उद्घाटन केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते होणार आहे. विशेष अतिथी म्हणून वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, तर प्रमुख अतिथी म्हणून राज्यसभा सदस्य राकेश सिन्हा व खासदार प्रतिभा धानोरकर उपस्थित राहणार आहेत. गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे यांचीही यावेही प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या महोत्सवाचे नियोजन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण व संविधान सन्मान महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे. संविधानाच्या जनजागृतीसाठी गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रम व कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. हा महोत्सव २६ जानेवारी २०२५ पर्यंत साजरा करण्यात येणार असून, विद्यापीठस्तरावर दोन दिवसीय संविधान साहित्य संमेलन तसेच समारोपीय कार्यक्रम घेण्यात येणार आहे, असेही हिरेखण यांनी यावेळी सांगितले. गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने साजरा होणाऱ्या या संविधान सन्मान महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.
0 comments:
Post a Comment