सादिक थैम वरोरा :- वरोरा येथील आनंदवन महारोगी सेवा समिती संस्थेला कुष्ठरुग्णांचे उपचार आणि पुनर्वसनासाठी 1 कोटी 86 लाख रुपये तर, आनंद अंध, मुकबधीर आणि संधीनिकेतन दिव्यांग कार्यशाळेसाठी 1 कोटी 22 लाख रुपये असे एकूण 3 कोटी 8 लाख रुपयांचा निधी तातडीने वितरीत करण्याचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी दिले असून उपमुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर निधी वितरीत करण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्यात आली आहे.
Fund of Rs 3 crore approved to resolve Anandavan's financial crisis
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने दखल घेऊन केलेल्या या कार्यवाहीमुळे थोर समाजसेवक दिवंगत बाबा आमटे आणि साधनाताई आमटे यांनी 75 वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या महारोगी सेवा समितीसमोरील आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे.दिवंगत बाबा आमटे आणि साधनाताई आमटे यांनी कुष्ठरुग्णांच्या सेवेसाठी 75 वर्षांपूर्वी 1949 मध्ये चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा तालुक्यातील आनंदवन येथे महारोगी सेवा समितीची स्थापना केली आहे. संस्थेचं यंदा अमृतमहोत्सवी वर्ष असून संस्था आर्थिक अडचणीत असल्याची बाब संस्थेचे सचिव डॉ. विकास आमटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या लक्षात आणून दिली. डॉ. विकास आमटे यांच्या मागणीची तातडीने दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संस्थेस 3 कोटी 8 लाख रुपयांचा निधी तातडीने वितरीत करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. त्यानुसार तातडीने कार्यवाही करीत हा निधी संस्थेस तात्काळ वितरीत करण्यात आला आहे.
थोर समाजसेवक दिवंगत बाबा आमटे आणि साधनाताई यांनी स्थापन केलेली ही संस्था गेली 75 वर्षे सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून कुष्ठरुग्णांचे उपचार, पुनर्वसनाच्या माध्यमातून त्यांची सेवा करत आहे. संस्थेतर्फे ग्रामीण भागांतील प्रकल्पांत पुनर्वसित दिड हजार कुष्ठरोग मुक्त दिव्यांग-निराधार ,वृद्ध, अनाथ, परित्यक्ता, मानसिकदृष्ट्या अपंग बांधवांची आणि त्यांची मुलांची काळजी घेतली जाते. विशेष शाळा आणि व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रात निवासी तीनशे दिव्यांग विद्यार्थी-प्रशिक्षणार्थींना शिक्षण-प्रशिक्षण दिले जाते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी अनिवासी विज्ञान, कला, वाणिज्य साडेतीन हजार विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या शिक्षणाची सोयही संस्थेमार्फत केली जात आहे. संस्थेच्या या सामाजिक बांधलकी आणि सेवाकार्याची दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य शासनाकडून देय 3 कोटी 8 लाख रुपयांचा निधी संस्थेस तात्काळ वितरीत केला आहे.
0 comments:
Post a Comment