मुंबई :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी राज्य मंडळांनी अनोखा फतवा काढला आहे. फेब्रुवारी- मार्च 2025 मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी केंद्र शाळे व्यतिरिक्त अन्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेमधून केंद्र संचालक, पर्यवेक्षक व अन्य कर्मचारी नियुक्त करण्याचा आदेश राज्य मंडळाने नुकताच प्रसिद्ध केला आहे. राज्य मंडळाच्या या अजब फतव्याविरोधात शिक्षण संघटना मधून मोठ्या प्रमाणात असंतोष व्यक्त केला जात आहे.
Strange Order of the education board..
रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे अध्यक्ष सागर पाटील यांनी राज्य मंडळाच्या या आदेशावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राज्य मंडळांनी या पद्धतीने माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर अविश्वास दाखवणे उचित नाही. यापेक्षा राज्य मंडळांनी परीक्षा व पेपर तपासणीचे काम त्रयस्थ यंत्रणेद्वारे करून घ्यावे असे सुचविले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नुकत्याच काढलेल्या एका परिपत्रकामध्ये परीक्षा पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी ज्या माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी ज्या परीक्षा केंद्रावर प्रविष्ट होणार आहेत त्या परीक्षा केंद्रासाठी केंद्र संचालक, पर्यवेक्षक व परीक्षेची संबंधित व्यक्तीची नियुक्ती सदर केंद्रा व्यतिरिक्त इतर अन्य माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांमधून करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे नमूद केले आहे. राज्य मंडळाच्या स्थापनेपासून प्रचलित पद्धतीनेच परीक्षा घेतली जाते. केंद्रावर सहभागी शाळांमधील मुख्याध्यापकांमधून केंद्र संचालक,शिक्षकांमधून पर्यवेक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते. अचानकपणे याच वर्षी राज्य मंडळाला परीक्षा पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी हा मार्ग कसा सुचला व आजपर्यंत परीक्षा पारदर्शक पद्धतीने पार पडत नव्हत्या का असे प्रश्न पाटील यांनी उपस्थित केले आहेत. परीक्षा केंद्रावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे व येणाऱ्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी संबंधी शाळेचे मुख्याध्यापकच केंद्र संचालक असावेत असा आग्रह यापूर्वी राज्य मंडळाकडून केला जात असे यावर्षी मात्र राज्य मंडळ या धोरणांमध्ये बदल करण्याचा विचार करत आहे.
राज्य मंडळाच्या या धोरणामुळे राज्यातील समस्त माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर अविश्वास दाखविला जात आहे. त्यामुळे राज्य मंडळांनी हे धोरण तात्काळ बदलावे अन्यथा सर्व परीक्षा प्रक्रियाच त्रयस्थ यंत्रणेद्वारे पार पाडावी अशी मागणी रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे अध्यक्ष सागर पाटील यांनी मंडळाकडे केली आहे.
0 comments:
Post a Comment