जावेद शेख भद्रावती : अखिल भारतीय ग्राहक पंचायत भद्रावती आणि अन्न व औषध प्रशासन चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी सकाळी समाज भवन भद्रावती येथे ग्राहक आरोग्य जागरूकता मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. व्यावसायिकांनी खाद्य परवाना न काढल्यास ५ लाखांच्या दंडाची शिक्षा होणार असून खाद्यपदार्थांशी संबंधित सर्वच व्यावसायिकांनी खाद्य परवाना (फुड लायसेंस) काढण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन चंद्रपूरचे सहाय्यक आयुक्त प्रवीण उमप यांनी केले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून ते उपस्थित होते.
कार्यक्रमाला भद्रावतीचे तहसिलदार राजेश भांडारकर, भद्रावती नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी विजयकुमार जांभुळकर, चंद्रपूरचे अन्न सुरक्षा अधिकारी गिरीश सातकर, नागरी प्राथमीक आरोग्य केंद्र भद्रावतीचे वैद्यकिय अधिकारी डॉ. आशीष देवतळे, ग्राहक पंचायत भद्रावतीचे अध्यक्ष बालाजी दांडेकर, सचिव प्रविण चिमुरकर यावेळी मंचावर उपस्थित होते.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत भद्रावतीकडून मागील काही दिवसांपासून शहरात 'ग्राहक आरोग्य जागरुकता मोहिम' राबविली जात आहे. या मोहिमेअंतर्गत शहरातील सर्व खाद्य (अन्न) पदार्थ विकणाऱ्या हॉटेल ची तपासणी करण्यात आली होती. तपासणी दरम्यान अनेक समस्या आढळून आल्या होत्या. त्यामुळे अखिल भारतीय ग्राहक पंचायत भद्रावती आणि अन्न व औषध प्रशासन, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने याच मोहिमेअंतर्गत सोमवार दि.२४ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता, समाज भवन, डॉ. मिलमिले हॉस्पिटल मागे, भद्रावती येथे ग्राहक आरोग्य जागरुकता मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे संचालन करूणा मोघे, प्रास्ताविक प्रवीण चिमुरकर यांनी केले. वसंत वऱ्हाटे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ग्राहक पंचायत भद्रावतीचे सर्व पदाधिकारी तसेच महिला सदस्यांनी अथक परिश्रम घेतले
'फुड लायसेंस' शिबीर २८ फेब्रुवारीला
कार्यक्रमाला शहरातील बहुतांश खाद्य (अन्न) पदार्थ विक्रेते, हॉटेल व्यावसायिक तसेच ग्राहक उपस्थित होते. यावेळी ग्राहक आरोग्य, स्वच्छता, कायदा, नियम, तसेच ग्राहक आरोग्यावर होणारे परिणाम याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सर्व खाद्य व्यावसायिकांनी खाद्य परवाना काढण्याचे आवाहन यावेळी ग्राहक पंचायत भद्रावती तसेच अन्न व औषध प्रशासनाकडून करण्यात आले. तसेच ज्या व्यावसायिकांनी अजुनपर्यंत फुड लायसेंस काढलेले नाही अशा व्यावसायिकांकरिता २८ फेब्रुवारी रोजी समाज भवन, डॉ. मिलमिले हॉस्पिटलच्या मागे भद्रावती येथे दुपारी १२ वाजता शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
0 comments:
Post a Comment