चंद्रपुर :- आमदार किशोर जोरगेवार यांनी आज महाजनकोच्या व्यवस्थापकीय संचालक राधाक्रिष्णा यांची मुंबई येथे भेट घेतली असून, सीएसटीपीएसच्या युनिट क्रमांक ८ व ९ मधून होणाऱ्या प्रदूषण नियंत्रणाबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांनी प्रदूषण नियंत्रणासाठी तात्काळ प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
यावेळी, प्रदूषणामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. स्थानिक नागरिकांना श्वसनासंबंधी विकार, त्वचारोग आणि इतर आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले.
Immediate concrete steps should be taken to prevent pollution – MLA Kishor Jorgewar
तसेच, प्रदूषणामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले. धुरामुळे शेतमालाच्या गुणवत्तेत घट होत असून, त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. प्रदूषण नियंत्रणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व प्रशासनाच्या सक्रिय पुढाकाराची आवश्यकता असल्याचे आमदार जोरगेवार यांनी म्हटले आहे.
प्रदूषण कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर या बैठकीत चर्चा झाली. प्रकल्पाच्या कार्यप्रणालीत सुधारणा करणे, स्थानिक जनतेच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आणि शेतीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करणे या दृष्टीने त्वरित उपाययोजना राबविण्याची मागणी यावेळी आमदार जोरगेवार यांनी केली.महाजनको प्रशासनाने त्यांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला असून, लवकरच प्रदूषण नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन दिले आहे.
0 comments:
Post a Comment