चंद्रपूर: शहरातील निसर्गरम्य अशा रामबाग ग्राऊंडवर अचानक जिल्हा परिषदेच्या इमारतीचे बांधकाम सुरू झाल्याने स्थानिक जनता तसेच शहरातील खेळाडू व युवकांमध्ये संतापाची लाट उसळली. या मैदानावर काम सुरू झाल्यानंतर स्थानिक नागरिक व खेळाडूंनी प्रशासनाला हे काम बंद करण्याची विनंती केली. परंतु प्रशासनाने याची दखल घेतली नाही. अखेर या मैदानावर कंत्राटदाराने भला मोठा खड्डा खोदल्यानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी आज बुधवार दिनांक 7 मे रोजी सकाळी 9 वाजता जिल्हा परिषदेच्या नविन इमारतीचे बांधकाम बंद पाडले.
यावेळी मनपाचे माजी नगरसेवक पप्पू देशमुख व राजेश अडुर यांचेसह श्रीकांत भोयर,रविंद्र माडावार,दौलत साटोणे, नवनाथ देरकर, प्रवीण कुमार वडलोरी,माधव डोडाणी,तपन दास,कोमील मडावी,राहुल ठाकरे,प्रफुल बैरम,अक्षय येरगुडे,अमुल रामटेके,अमोल घोडमारे इत्यादी नागरिक व खेळाडू उपस्थित होते.
उद्या रामबाग मैदानावर निर्णायक बैठक
रामबाग ग्राऊंड 50 वर्षांपासून सर्वसामान्यांच्या हक्काचे ग्राउंड आहे, येथिल नैसर्गिक सौंदर्य नष्ट करू देणार नाही, इथे सिमेंट काँक्रीटचे जंगल होऊ देणार नाही, इथे कोणत्याही इमारतीचे बांधकाम होऊ देणार नाही,नाही म्हणजे नाही असा दृढ संकल्प नागरिक व खेळाडूंनी केला आहे. याबाबत पुढील भूमिका ठरविण्यासाठी उद्या दिनांक 8 मे रोजी सकाळी 7 वाजता रामबाग मैदानावर निर्णय बैठक घेण्यात येणार आहे. 'सेव्ह रामबाग ग्राऊंड, रामबाग मैदान बचाव संघर्ष समिती' च्या बॅनरखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या भागातील तसेच शहरातील सर्वसामान्य नागरिक, युवक-युवती व खेळाडूंनी या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केले आहे.
0 comments:
Post a Comment