चंद्रपूर प्रतिनिधी :-
चिमूर प्रकल्पांतर्गत चिंधीचक येथील निवासी आदिवासी कन्या आश्रम शाळेत एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. मृत विद्यार्थिनीचे नाव समीक्षा पुरुषोत्तम चौधरी (रा. जामसाला) असे असून ती दहावी वर्गात शिकत होती.
Student dies at tribal girls' ashram schoolचिमूर प्रकल्पांतर्गत जांभुळघाट, चिंधीचक, कोसंबी गावली आणि चंदनखेडा येथे शासकीय आदिवासी आश्रम शाळा चालवल्या जातात. त्यापैकी फक्त चिंधीचक येथे कन्या आश्रम शाळा कार्यरत आहे. येथे विविध गावांतील मुली निवासी शिक्षण घेतात. दहावीत शिकणाऱ्या समीक्षा चौधरीची तब्येत १ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता अचानक बिघडली. तिला खोकला, उलटी व श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तत्काळ प्राचार्य, अधीक्षक व कर्मचाऱ्यांनी तिला नागभीड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्याचवेळी तिच्या पालकांनाही कळविण्यात आले व काही कर्मचारी त्यांना आणण्यासाठी गेले.
नागभीड रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर तिची प्रकृती अधिकच खालावल्याने तिला ब्रह्मपुरी येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथेही तिचा श्वास अडखळू लागला, ऑक्सिजनची पातळी घटली व हृदयाचे ठोके वाढू लागले. त्यामुळे डॉक्टरांनी नागपूरला नेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार तिला तात्काळ नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात नेण्यात आले. तेथे दाखल करून तिचे ईसीजी करण्यात आले. मात्र, तपासणीदरम्यान तिला मृत घोषित करण्यात आले.
मंगळवारी नागपूर वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह पालकांच्या ताब्यात देण्यात आला. सिंदेवाही तालुक्यातील जामसाला येथे संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
---
बॉक्स
मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट नाही
दहावीतील समीक्षा हिच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. नागपूर येथे करण्यात आलेल्या शवविच्छेदनाचा अहवाल अजून प्राप्त झालेला नाही. हा अहवाल यायला आठवडाभर लागू शकतो. प्राथमिक अंदाजानुसार, हृदयविकाराशी संबंधित काही कारणांमुळे प्रकृती खालावली असावी, असे मानले जात आहे. या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
---
0 comments:
Post a Comment