चंद्रपूर :
शहरातील तुकुम परिसरातील शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालय परिसरात एका २७ वर्षीय युवकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना २३ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी उघडकीस आली. महाविद्यालयाच्या समोरील झाडीत एक युवकाचा रक्तबंबाळ मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली.
27-year-old youth murdered over a petty dispute
नागरिकांनी ही माहिती पोलीस स्टेशन रामनगरला दिल्यानंतर, पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. प्राथमिक तपासात मृत व्यक्तीचे नाव नितेश वासुदेव ठाकरे (वय २७ वर्ष, रा. समता नगर, दुर्गापूर) असे असल्याचे समोर आले.
पोलिसांनी मृतदेहाची तपासणी केल्यावर नितेशच्या शरीरावर बेदम मारहाणीचे जखमांचे निशाण असल्याचे निदर्शनास आले. तसेच, रोडवरून ओढत नेऊन त्याचे शव झाडीत फेकल्याचेही आढळले. घटनेची गंभीरता लक्षात घेऊन फॉरेन्सिक पथकास घटनास्थळी बोलाविण्यात आले असून, सर्व पुरावे ताब्यात घेण्यात आले आहेत.
तपासादरम्यान पोलिसांना समजले की किरकोळ वादातून नितेश ठाकरेचा खून करण्यात आला आहे. तात्काळ स्थानीक गुन्हे शाखा आणि रामनगर पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार करून आरोपींचा शोध सुरु केला. अवघ्या एका तासात सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले.
आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत —
(१) करण गोपाल मेश्राम (वय २२),
(२) यश छोटेलाल राऊत (वय १९),
(३) अनिल रामेश्वर बोंडे (वय २२),
(४) प्रतिक माणिक मेश्राम (वय २२),
(५) तौसिक अजीज शेख (वय २३),
(६) सुजीत जयकुमार गणविर (वय २५)
हे सर्व आरोपी दुर्गापूर परिसरातील रहिवासी असून, त्यांनी आपसातील किरकोळ वादातून नितेशचा खून केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
आरोपी क्रमांक १ ते ५ यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने, तर आरोपी क्रमांक ६ यास पोस्टे रामनगरच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले.
सदर प्रकरणी पोलीस स्टेशन रामनगर येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास रामनगर पोलीस करत आहेत.
ही कारवाई मा. मुमक्का सुदर्शन, पोलीस अधीक्षक, चंद्रपूर व मा. ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली,
पोलीस निरीक्षक अमोल काचोरे (स्थानीक गुन्हे शाखा) व पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख (पोस्टे रामनगर) यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
सदर पथकात सपोनि देवराव नरोटे, सपोनि दीपक कांक्रेडवार, सपोनि बलराम झाडोकार, पोउपनि विनोद भुरले, संतोष निंभोरकर, सर्वेश बेलसरे, सुनिल गौरकार यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी सहभागी होते.
पोलीसांच्या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे अवघ्या एका तासात आरोपी ताब्यात घेतले गेले असून, या कामगिरीचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.
0 comments:
Post a Comment