चंद्रपूर, दि. २२ ऑक्टोबर :
दिवाळी सणानिमित्त ऑनलाईन खरेदीचा ट्रेंड वाढला असला तरी याच संधीचा फायदा घेत सायबर गुन्हेगारांनी देखील आपले "सेल मोड" ऑन केले आहे. फेस्टिव्हल ऑफर, कॅशबॅक, क्युआर कोड स्कॅम आणि फेक ई-कॉमर्स वेबसाईटच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढत असल्याने चंद्रपूर पोलिसांनी नागरिकांना “ऑनलाईन खरेदीत सजग राहा” "Be careful when shopping online" असा इशारा दिला आहे.
💻 Shopping online during Diwali? Be careful!
राष्ट्रीय सायबर सुरक्षा जागरूकता महिना म्हणून ऑक्टोबर २०२५ साजरा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मा. श्री. मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक चंद्रपूर आणि मा. ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात विविध ठिकाणी सायबर जनजागृती मोहिमा राबविण्यात येत आहेत. शाळा, महाविद्यालये तसेच वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडच्या विविध कार्यालयांमध्ये नागरिकांना सायबर स्वच्छता, ऑनलाईन फसवणूक प्रतिबंध आणि सुरक्षित डिजिटल पद्धतीबद्दल व्यावहारिक ज्ञान देण्यात येत आहे.
सणासुदीच्या काळात नागरिकांचे गावाकडे जाणे-येणे वाढले असून, बँका बंद असल्याचा फायदा सायबर गुन्हेगार घेतात. त्यामुळे आज चंद्रपूर बसस्थानक व रेल्वे स्टेशन परिसरात सायबर पोलीस स्टेशनच्या पथकाने प्रवाशांमध्ये सायबर सुरक्षा जनजागृती करण्यात आली. प्रवाशांना सायबर फसवणुकीपासून कसे सुरक्षित राहावे, याबाबत माहिती देण्यात आली तसेच पॉम्पलेटचे वाटप करून “दिपावलीतही डिजीटल सजगता ठेवा” असा संदेश देण्यात आला.
पोलीस अधीक्षक कार्यालयाने नागरिकांना सूचित केले आहे की, खात्यातून पैसे गेल्याचे लक्षात आल्यास विलंब न करता सायबर हेल्पलाइन क्रमांक १९३० किंवा १९४५ वर संपर्क साधावा. तत्काळ कळविल्यास रक्कम परत मिळण्याची शक्यता जास्त असते. तसेच मोबाईल हरविल्यास ceir.gov.in या संकेतस्थळावर तात्काळ रिपोर्ट करावा आणि सायबर गुन्ह्यांबाबत cybercrime.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
0 comments:
Post a Comment