भिसी :-अवैधरीत्या गौण खनिज (रेती) उपसा करून वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध भिसी पोलिसांनी कारवाई करत ट्रॅक्टर-ट्रॉलीसह ६ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Bhishi police crackdown on illegal sand transportation
पोलीसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार ११ डिसेंबर २०२५ रोजी भिसी–जांभुळघाट मार्गावरील कॅनलजवळ नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी विना क्रमांकाच्या ट्रॅक्टर-ट्रॉलीतून अवैधरीत्या रेतीची वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत ट्रॅक्टरसह दोघांना ताब्यात घेतले.
या कारवाईत वैभव प्रकाश कुंभरे (२९, रा. बोळधा) व लक्ष्मण मारोती शिवरकर (५२, रा. पारडपार) यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन भिसी येथे भारतीय न्याय संहिता–२०२३, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता तसेच मोटार वाहन कायदा अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींकडून अवैध रेती वाहतुकीसाठी वापरलेला ट्रॅक्टर-ट्रॉली (अंदाजे किंमत ६ लाख रुपये) व त्यामधील एक ब्रास रेती (५ हजार रुपये) असा एकूण ६ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास भिसी पोलीस करीत आहेत.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे व उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल (वरोरा, अतिरिक्त कार्यभार चिमूर) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अमोल बारापात्रे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. कारवाईत भिसी पोलीस ठाण्याच्या पथकाने सहभाग घेतला.
---
0 comments:
Post a Comment