नागभीड :
तळोधी-नागभीड या मुख्य महामार्गावरील सोनेवाट (तळोधी) परिसरात आज सायंकाळी सुमारे ५ वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून महामार्गावरील बेफाम वेगाबाबत संतापाची लाट उसळली आहे.
Horrific Accident on Talodhi Road: Two Dead, One Critically Injured in Collision Between Tourist Bus and Two-Wheeler
मृतांमध्ये जगदीश नामदेव नेवारे (वय २६, रा. मुरपार) व अंजना यादव दुधकुरे (वय १९, रा. तळोधी) यांचा समावेश आहे. तर पियूष उर्फ मयूर कोहळे (रा. मुरपार) हा युवक गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी गडचिरोली येथे हलविण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तळोधीहून सोनेवाट मार्गे मुख्य रस्त्यावर दुचाकीवरून तिघे जण ट्रिपल सीटने जात असताना, भरधाव वेगाने येणाऱ्या सांकेत ट्रॅव्हल्स (MH 15 AK 1704) या प्रवासी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील तिन्ही जण ट्रॅव्हल्सच्या पुढील भागात घुसले. दुचाकी पूर्णपणे चकनाचूर झाली असून तिचे समोरील चाक दूरवर फेकले गेले.
अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमीला तत्काळ रुग्णालयात हलविण्यात आले. काही काळासाठी महामार्गावरील वाहतूकही विस्कळीत झाली होती.
दरम्यान, या प्रकरणी पुढील तपास ठाणेदार राहुल गुहे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय लांबट व मानकर हे करीत असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.
महामार्गावरील वाढता वेग, नियमांचे उल्लंघन आणि बेफिकीर वाहनचालक यामुळे अशा दुर्घटना घडत असल्याने प्रशासनाने कडक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे
0 comments:
Post a Comment