चंद्रपूर, दि. ३ मे २०२६:
चंद्रपूर येथील स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) अट्टल घरफोड्या करणाऱ्या आरोपीला अटक करत तीन घरफोडीच्या गुन्ह्यांचा उलगडा केला आहे. या कारवाईत आरोपीकडून सोने-चांदीच्या दागिन्यांसह मोटारसायकल व मोबाईल असा एकूण १७ लाख ७८ हजार २२६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस स्टेशन मुल येथे गुन्हा क्रमांक ३९३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१ (३), ३३१ (४) व ३०५ अंतर्गत दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेला आरोपीबाबत गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने अमोल इलमकर (रा. दुर्गापूर) यास ताब्यात घेऊन तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सखोल चौकशी केली. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.
या प्रकरणात आरोपीकडून चोरीस गेलेले १०५ ग्रॅम सोन्याचे दागिने पंचासमक्ष जप्त करण्यात आले. तसेच, पोलीस स्टेशन घुग्गुस येथे दाखल गुन्हा क्रमांक १४८/२०२६ अन्वये चोरीस गेलेल्या चांदीच्या दागिन्यांपासून तयार केलेली सुमारे १ किलो ४११ ग्रॅम वजनाची चांदीची लगड आरोपीच्या सांगण्यानुसार एका महिलेकडून जप्त करण्यात आली.
याशिवाय, पोलीस स्टेशन मुल येथे मंदिरात झालेल्या चोरीप्रकरणी दाखल गुन्हा क्रमांक ३३२/२०२६ हाही आरोपीनेच केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपीकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली यामाहा आर-१ मोटारसायकल तसेच मोबाईल फोनही जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईमुळे एकूण तीन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून, परिसरातील गुन्हेगारीवर आळा बसण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या पथकात सहायक पोलीस निरीक्षक बलराम झाडोकार, उपनिरीक्षक संतोष निंभोरकर, सर्वेश बेलसरे, सुनील गौरकार यांच्यासह इतर अधिकारी व अंमलदारांचा समावेश होता. सायबर पोलीस स्टेशन चंद्रपूरचेही सहकार्य लाभले.
आरोपीस पुढील तपासासाठी पोलीस स्टेशन मुल यांच्या ताब्यात देण्यात आले असून, अधिक तपास सुरू आहे.
0 comments:
Post a Comment