(भद्रावती प्रतिनिधी जावेद शेख):-
शेगाव बु. येथील आष्टा बायपास रोडवर आज सकाळी नालेसफाईच्या कामादरम्यान दोन मजुरांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला. हा वाद सोडवण्यासाठी गेलेल्या एका इसमाची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
या घटनेत विश्वनाथ परसराम कांबळी (वय ६५, रा. शेगाव) यांचा मृत्यू झाला असून महेंद्र रमेश भुरे (वय ३६, रा. दहेगाव जोशी, ता. पारशिवनी, जि. नागपूर) याने त्यांच्यावर दगडाने डोक्यावर वार करून हत्या केली. घटनेनंतर आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना संतप्त जमावाने त्याचा पाठलाग केला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच शेगाव पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अवघ्या एका तासाच्या आत आरोपीला अटक करून बेड्या ठोकल्या.
प्राथमिक माहितीनुसार, आरोपी महेंद्र भुरे हा नागपूर जिल्ह्यातील रहिवासी असून शेगाव येथे नालेसफाईचे काम करत होता. मात्र, या कामाचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराकडे मजुरांची कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. यामुळे संबंधित ठेकेदाराच्या हलगर्जीपणावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ग्रामपंचायतीमार्फत दिल्या जाणाऱ्या कामांमध्ये अशा प्रकारची बेपर्वाई होत असेल, तर भविष्यात आणखी गंभीर घटना घडल्यास जबाबदारी कोण घेणार, असा सवाल गावकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
शेगाव पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. मागील काही दिवसांपासून परिसरात वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत तब्बल १०२ गावे येत असल्याने उपलब्ध मनुष्यबळ अपुरे पडत असून गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस दलात वाढ करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश कोण लावणार?
नुकतेच नागपूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी गुन्हेगारीवर नियंत्रणाबाबत उपाययोजनांची माहिती दिली होती. मात्र, अशा घटनांमुळे स्थानिक पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
0 comments:
Post a Comment