राजुरा प्रतिनिधि— राजुरा तालुक्यातील विरूर स्टेशन परिसरातील धानोरा गावात एका जिनिंगच्या बांधकामासाठी सरकारी तलावातून कथितपणे अवैधरीत्या मुरूम उत्खनन करण्यात आल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. याबाबतचे फोटो, व्हिडिओ आणि इतर माहिती संबंधित तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना पाठवूनही त्यांनी तत्काळ प्रतिसाद दिला नसल्याचा आरोप होत असून, महसूल प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
Allegation of alleged illegal mining of murrum in Dhanora; Delay in action despite providing information? Question mark on the role of Talathi-Mandal officials
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, जिनिंगच्या कामासाठी सरकारी तलावातील मुरूम मोठ्या प्रमाणात काढून वापरण्यात आला आहे. तसेच जंगल मार्गावरही मुरूम टाकून रस्ता तयार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. जिल्ह्यात मुरूम उत्खननावर निर्बंध असताना देखील सुमारे १०० हून अधिक ट्रिप मुरूम काढण्यात आल्याचे फोटो व व्हिडिओतून दिसून येत असल्याचा दावा नागरिकांनी केला आहे.
यासंदर्भात तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना मोबाईलद्वारे संपर्क साधून माहिती देण्यात आली. मात्र, त्यांच्याकडून कोणताही समाधानकारक प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. दुसरीकडे, तहसीलदारांशी संपर्क साधला असता त्यांनी "कारवाई सुरू आहे" असे सांगितल्याचे नागरिकांनी नमूद केले. मात्र, प्रत्यक्षात उत्खननाचे काम सुरूच असल्याचा दावा स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, परिसरात अशीही चर्चा आहे की संबंधितांना मुरूम काढण्याची कोणती अधिकृत परवानगी देण्यात आली होती का, याबाबत प्रशासनाने स्पष्ट भूमिका घ्यावी. जर कोणतीही वैध परवानगी नसेल, तर संबंधितांवर तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
नागरिकांनी जिल्हाधिकारी व वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांकडे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून, आरोप सिद्ध झाल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई तसेच कर्तव्यात हलगर्जीपणा आढळल्यास संबंधित महसूल अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली आहे.
टीप : या वृत्तातील आरोप हे स्थानिक नागरिकांनी केलेल्या तक्रारींवर आधारित असून, संबंधित जिनिंग व्यवस्थापन व महसूल विभागाची अधिकृत बाजू मिळाल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल.
0 comments:
Post a Comment