जावेद शेख भद्रावती प्रतिनिधी ;
मौजा बेलोरा, ता. भद्रावती, जि. चंद्रपूर येथे नैसर्गिक नाल्याचा प्रवाह अडविल्यामुळे निर्माण झालेल्या कृत्रिम पूरस्थिती, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर झालेले नुकसान तसेच पुनर्वसनाच्या प्रलंबित प्रश्नासंदर्भात तंटामुक्ती समिती अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते आकाश गोपाळराव वानखडे यांनी आज नागपूर येथे महाराष्ट्राचे महसूलमंत्री मा. चंद्रशेखर बावणकुळे यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.Belora flood case at state level; Akash Wankhade's follow-up noted,
आकाश वानखडे यांनी संबंधित कंपनीकडून नैसर्गिक नाल्याचा प्रवाह अडविल्यामुळे परिसरात निर्माण झालेली पूरस्थिती, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान, स्थानिक नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी तसेच प्रशासनाच्या विविध विभागांकडे केलेल्या पाठपुराव्याची माहिती मंत्र्यांसमोर मांडली. या प्रकरणात तातडीने शासनाने हस्तक्षेप करून न्याय द्यावा, अशी ठाम मागणी त्यांनी केली.
या निवेदनाची गंभीर दखल घेत महसूलमंत्री मा. चंद्रशेखर बावणकुळे यांनी संबंधित सर्व विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मुंबई येथे तातडीने उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्याचे निर्देश दिले. तसेच संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून आवश्यक त्या प्रशासकीय व कायदेशीर कारवाईबाबत तत्काळ निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
यावेळी आकाश वानखडे यांनी संबंधित कंपनी व जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई, नैसर्गिक नाल्याचा मूळ प्रवाह पूर्ववत करणे, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई देणे तसेच पुनर्वसनाच्या सर्व मागण्या तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली.
भेटीनंतर आकाश वानखडे म्हणाले, “बेलोरा परिसरातील शेतकरी आणि नागरिकांना न्याय मिळेपर्यंत माझा संघर्ष थांबणार नाही. शासन स्तरावर या प्रकरणाचा शेवटपर्यंत पाठपुरावा करून दोषींवर कठोर कारवाई आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे.”
0 comments:
Post a Comment