भद्रावती जावेद शेख प्रतिनिधी: शहरातील किल्ला वार्ड येथील रहिवासी रमेश गुंडावार यांच्या घरी दुर्मिळ आणि वैशिष्ट्यपूर्ण असा हत्ती सरडा (Indian Chameleon) आढळून आला. घरात हत्ती सरडा आढळल्याची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ सार्ड NGO, भद्रावती यांच्याशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली.
माहिती मिळताच अनुप येरणे, आशिष चहाकाटे, शैलेश पारेकर, श्रीपाद बाकरे, पंकज मूरकुटे आणि Rescuer Team घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी हत्ती सरड्याला सुरक्षितपणे ताब्यात घेतले. त्यानंतर या घटनेची वनविभागाकडे नोंद करून, वनपरीक्षेत्र अधिकारी श्री. किरण धानकुटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वनरक्षक अमोल तिकट सर यांच्या सहकार्याने हत्ती सरड्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडण्यात आले.
हत्ती सरड्याची वैशिष्ट्ये
हत्ती सरड्याचे शास्त्रीय नाव Chamaeleo zeylanicus असून तो भारतातील स्थानिक गिरगिटाची एक प्रजाती आहे. महाराष्ट्रासह द्वीपकल्पीय भारतात त्याचा आढळ होतो. हा प्रामुख्याने झाडे व झुडपांवर राहणारा, दिवसा सक्रिय आणि कीटकभक्षी सरडा आहे.
हत्ती सरड्याची सर्वात उल्लेखनीय वैशिष्ट्ये म्हणजे स्वतंत्रपणे हालचाल करणारे डोळे, लांब व वेगाने पुढे जाणारी जीभ, फांदी पकडण्यासाठी उपयोगी पडणारी गुंडाळलेली शेपटी आणि रंग बदलण्याची क्षमता. रंगबदल हा केवळ परिसरात लपण्यासाठी नसून शरीराची अवस्था, तापमान आणि इतर वर्तनात्मक कारणांशीही संबंधित असतो.
वन्यजीव आपल्या परिसरात आढळल्यास त्यांना इजा न करता किंवा पकडण्याचा प्रयत्न न करता संबंधित वनविभाग किंवा अधिकृत वन्यजीव बचाव पथकाला माहिती देणे गरजेचे आहे. अशा वन्यजीवांचे सुरक्षित बचाव व नैसर्गिक अधिवासात पुनर्स्थापन करणे हेच त्यांच्या संवर्धनासाठी महत्त्वाचे आहे.
0 comments:
Post a Comment