"५७ मुक्या जीवांचा आक्रोश थांबला! अजयपूरमध्ये एलसीबीचा तस्करीच्या ट्रकवर छापा; ३५.८० लाखांचा मुद्देमाल जप्त"

चंद्रपूर : महाराष्ट्रातून तेलंगणा राज्यातील आदिलाबाद येथे कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या गोवंशीय जनावरांची वाहतूक करणाऱ्या तस्करांच्या टोळीवर चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने जोरदार कारवाई केली आहे. मुल-चंद्रपूर मार्गावरील मौजा अजयपूर येथे सापळा रचून गोवंशीय जनावरांनी भरलेला ट्रक पकडण्यात आला. या कारवाईत तब्बल ५७ गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली असून, ट्रकसह एकूण ३५ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एका आरोपीला अटक करण्यात आली असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.
"The cry of 57 silent lives has stopped! LCB raids smuggling truck in Ajaypur; Goods worth Rs 35.80 lakh seized"
दि. २२ नोव्हेंबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मुल-चंद्रपूर मार्गावरील अजयपूर येथे सापळा रचला. यावेळी एमएच १२ झेडई ४७८५ क्रमांकाचा ट्रक वाहनचालकासह ताब्यात घेण्यात आला.

ट्रकमध्ये ५७ गोवंशीय जनावरे (गाई-बैल) अत्यंत निर्दयीपणे कोंबून ठेवण्यात आली होती. जनावरांचे पाय व तोंड दोरीने बांधण्यात आले होते. तसेच त्यांच्या चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती. कत्तलीसाठी महाराष्ट्रातून तेलंगणा राज्यातील आदिलाबाद येथे ही अवैध वाहतूक केली जात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले.

या कारवाईत वाहनचालक नईमुद्दीन करीमुद्दीन शेख (वय ४०, रा. शांतीनगर, वॉर्ड क्रमांक ६, घुग्घुस, ता. जि. चंद्रपूर) याला अटक करण्यात आली आहे. तर इमरान (वय अंदाजे ३० ते ३५), इरशाद खान (वय अंदाजे ३५ ते ४०, दोघेही रा. मूर्तिजापूर, जि. अकोला) हे पाहिजे आरोपी असून, ट्रक मालक मोहम्मद साकीब मोहम्मद शकुर (रा. मूर्तिजापूर, जि. अकोला) याचाही या प्रकरणात समावेश आहे.

सुटका करण्यात आलेली सर्व ५७ जनावरे प्यार फाउंडेशन, छोटा नागपूर, चंद्रपूर येथे सुरक्षिततेसाठी जमा करण्यात आली आहेत. या कारवाईत ट्रक, मोबाईल व गोवंशीय जनावरे असा एकूण ३५ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी रामनगर पोलीस स्टेशनमध्ये प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६०, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६, मोटार वाहन अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनात एलसीबीची धडक कारवाई

पोलीस अधीक्षक आयुष नोपानी व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, सहायक पोलीस निरीक्षक योगेश हिवसे, पोलीस उपनिरीक्षक संतोष निंभोरकर, सर्वेश बेलसरे, सुनील गौरकार, पोलीस अंमलदार जयंत चुनारकर, सुनील आत्राम, संतोष येलपुलवार, अजित शेंडे, गजानन मडावी व प्रदीप मडावी यांनी ही कारवाई यशस्वी केली.

दरम्यान, जिल्ह्यात कुठेही अवैध गोवंश तस्करी अथवा जनावरांची निर्दयीपणे वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तत्काळ डायल ११२ वर संपर्क साधावा, असे आवाहन चंद्रपूर पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

"५७ मुक्या जीवांचा आक्रोश थांबला! अजयपूरमध्ये एलसीबीचा तस्करीच्या ट्रकवर छापा; ३५.८० लाखांचा मुद्देमाल जप्त"


Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment