राजुरा, दि.१६ नोव्हेंबर
नगर परिषद राजुरा हद्दीतील हनुमान नगर परिसरात नालीच्या पाण्याच्या व्यवस्थेअभावी नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. परिसरातील अनेक घरांमधून निघणारे सांडपाणी वाहून जाण्यासाठी योग्य नाली व्यवस्था नसल्याने हे पाणी एका मोकळ्या प्लॉटमध्ये सोडले जात आहे. परिणामी, या खुल्या जागेत सांडपाणी जमा होत असून परिसरात दुर्गंधी पसरत आहे.The problem of sewage is serious due to the lack of drains in Hanuman Nagar!
या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गवत, झुडपे आणि अनावश्यक वनस्पती वाढलेल्या आहेत. साचलेल्या सांडपाण्यामुळे डासांची उत्पत्ती होण्यास पोषक वातावरण निर्माण झाले असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेषतः परिसरातील रहिवाशांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असून डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विविध आजारांचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. हनुमान नगर परिसरातील अनेक घरांचे सांडपाणी याच खुल्या प्लॉटमध्ये येऊन जमा होत असल्याने ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. सांडपाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने पाणी साचून राहते. त्यामुळे परिसरातील स्वच्छता आणि आरोग्याच्या दृष्टीने ही बाब चिंताजनक ठरत आहे.
तात्पुरत्या उपाययोजनांऐवजी कायमस्वरूपी नाली बांधकामाची गरज असून सदर ठिकाणी योग्य नियोजन करून पक्क्या नालीचे बांधकाम करण्यात यावे आणि परिसरातील घरांमधून निघणाऱ्या सांडपाण्याची नियोजनबद्ध विल्हेवाट लावण्यात यावी, अशी मागणी वार्डातील नागरिकांकडून होत आहे. कायमस्वरूपी नाली बांधकाम झाल्यास सांडपाणी मोकळ्या प्लॉटमध्ये जाणार नाही, पाण्याचा योग्य निचरा होईल आणि दुर्गंधी तसेच डासांच्या प्रादुर्भावाची समस्या कमी होण्यास मदत होईल.
नगर परिषद राजुरा प्रशासनाने या समस्येची प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांच्या आरोग्याचा आणि परिसरातील स्वच्छतेचा विचार करता आवश्यक उपाययोजना कराव्यात. तसेच प्राधान्याने नाली बांधकामाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी अपेक्षा हनुमान नगरातील नागरिक व्यक्त करीत आहेत.
नागरिकांचा सवाल : घराघरातील सांडपाणी मोकळ्या प्लॉटमध्येच जमा होत राहणार का? की कायमस्वरूपी नाली बांधकाम करून या समस्येवर तोडगा काढला जाणार ? असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. हजारो रुपयांचे कर भरूनही नगर परिषद तर्फे योग्य व्यवस्था मिळत नसेल तर आम्ही कर भरायचा तरी कशाला असा सवाल उपस्थित केला जात आहे.
0 comments:
Post a Comment