चंद्रपूर : दुर्गापूर येथील चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्र (CTPS) परिसरातून सुमारे ६०० किलो लोखंडी साहित्य चोरी केल्याचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या पथकाने उघडकीस आणला आहे. गुप्त बातमीदाराकडून मिळालेली माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणातील सहा आरोपींना ताब्यात घेतले आहे.
Theft of 600 kg of iron materials from CTPS exposed!
प्राप्त माहितीनुसार, पोलीस स्टेशन दुर्गापूर येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ४५०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२), ३(७) अंतर्गत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १६ नोव्हेंबर २०२६ रोजी गुप्त माहिती व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा माग काढत सहा जणांना ताब्यात घेतले.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींमध्ये दुर्गाप्रसाद दुकालु यादव (वय ४०, रा. सुमित्रानगर, चंद्रपूर), संजय जोहरी ठाकूर (वय ३१), नारद भगवानसिंग निषाद (वय ४०), नजीर उस्मान शेख (वय ३९), शेख अहमद शेख हसन (वय ४०) आणि शेख इम्रान शेख बिस्मिल्लाह (वय ३६, रा. तुकूम, चंद्रपूर) यांचा समावेश आहे. यातील शेवटचा आरोपी भंगार व्यावसायिक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी १५ नग लोखंडी 'बिटर आर्म हँगर असेंब्ली' हस्तगत केली असून, या साहित्याचे एकूण वजन अंदाजे ६०० किलो आहे. जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे १२ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.
सदर आरोपींना पुढील तपासासाठी दुर्गापूर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. या चोरीच्या प्रकरणात आणखी काही बाबी उघडकीस येतात का, याकडे आता लक्ष लागले आहे.
गुप्त माहितीदारांचे जाळे आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले.
0 comments:
Post a Comment