- अभय बंग संमेलनाध्यक्ष, पालकमंत्री मुनगंटीवार उद्घाटक
- चांदा क्लबवर सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराज व तुषार सुर्यवंशी यांचे प्रबोधन
चंद्रपूर, दि.31 जानेवारी- सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या वतीने आयोजित दोन दिवसीय सातव्या राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाला शनिवारपासून येथील चांदा क्लब ग्राऊंडवर सुरुवात होत असून ज्युबिली हायस्कूल येथून सकाळी काढण्यात येणाऱ्या व्यसनमुक्ती दिंडीने या संमेलनाची सुरुवात होणार असल्याची माहिती सहाय्यक समाज कल्याण आयुक्त प्रसाद कुळकर्णी यांनी गुरुवारी आयोजित पत्रपरिषदेत दिली.
केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, राज्याचे अर्थ, नियोजन व वनेमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. सुप्रसिद्ध समाजसेवक डॉ. अभय बंग संमेलनाध्यक्ष राहणार आहेत. सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले संमेलनाच्या अध्यक्षस्थानी राहतील. याप्रसंगी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, आदिवासी विकास राज्यमंत्री अंबरीशराजे आत्राम, इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष ओमप्रकाश यादव, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, जि.प.अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, आमदार नागो गाणार, आमदार अनिल सोले, आमदार रामदास आंबटकर, आमदार विजय वडेट्टीवार, आमदार नानाजी श्यामकुळे, आमदार संजय धोटे, आमदार सुरेश धानोरकर, आमदार कीर्तिकुमार भांगडीया, डॉ.राणी बंग, समाजप्रबोधनकार सत्यपाल महाराज, सुप्रसिद्ध अभिनेत्री अनिता केळकर, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, मनपा आयुक्त संजय काकडे आदींची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे.
दोन दिवसीय संमेलनात 'तंबाखू मुक्त महाराष्ट्राचे स्वप्न आणि वास्तव', 'व्यसनमुक्ती उपचार पद्धती, गरज आणि यश', 'दारुबंदीनंतर चंद्रपूर, वर्धा व गडचिरोली जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेमुळे झालेले सकारात्मक बदल, प्रशासन आणि समाजाची जबाबदारी', 'अमली पदार्थांचा विळखा आणि उपाय योजना,' 'व्यसनमुक्ती प्रसार माध्यमे आणि साहित्यिकांची जबाबदारी' या विषयावर मान्यवरांच्या उपस्थितीत चर्चासत्र होणार आहे.
2 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराज यांचे जाहीर प्रबोधन कार्यक्रम होणार आहे. 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता सप्तखंजेरी वादक तुषार सूर्यवंशी यांचा कार्यक्रम होणार आहे. या संमेलनात 2017-18 व 2018-19 च्या राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाच्या 2 तारखेच्या उदघाटन सोहळयाला जेष्ठ सामाजिक कार्याकर्त्या डॉ.राणी बंग, संप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज, सुप्रसिध्द अभिनेत्री अनिता दाते-केळकर, उपस्थित राहणार आहेत. तर 3 फेब्रुवारीला पुरस्कार वितरण सोहळयाला सुप्रसिध्द अभिनेत्री निशीगंधा वाड उपस्थित राहणार आहे. या संमेलनास जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त प्रसाद कुळकर्णी यांनी पत्रपरिषदेत केले.
0 comments:
Post a Comment