Ads

व्यवसाय नियोजन स्पर्धेतील उत्कृष्ट संकल्पनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणार: सचिन कलंत्रेचंद्रपूर, दि. 11 सप्टेंबर: चंद्रपूर जिल्ह्याच्या औद्योगिक व आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी तसेच बेरोजगारीच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी नावीन्यपूर्ण संकल्पनावर आधारित उद्योगांना प्रोत्साहन देण्याकरिता उन्नत भारत अभियान अंतर्गत कौशल्य विकास व उद्योजकता विभागामार्फत जिल्ह्यात व्यवसाय नियोजन स्पर्धा 2019 आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील उत्कृष्ट संकल्पनांना गौरवण्यात येणार आहे. तसेच संबंधित विभागामार्फत 5 लाख रुपये पर्यंतचा कार्यादेश विजेत्या स्पर्धकाला प्राप्त होणार आहे. त्यामुळे नवसंकल्पनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणार असून जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अतिरिक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे यांनी केले. 11 सप्टेंबर 2019 रोजी जिल्हा माहिती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक राहुल पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी जी.आर. वायाळ, जिल्हा कौशल्य विभागाचे उपसंचालक भैय्याजी येरमे, गोंडवाना विद्यापीठाचे मनीष उत्तरवार, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक नरेश उगेमुगे उपस्थित होते.

शेती विकास, ग्रामीण विकास, सामाजिक विकास, पर्यावरण, औद्योगिक विकास या विषयावर संकल्पना स्पर्धकांना सादर करायचे आहे. नवसंकल्पनेतील उपाययोजना चंद्रपूर जिल्ह्याच्या सामाजिक प्रादेशिक आणि पर्यावरण या परिस्थितीला अनुसरून असावी. या स्पर्धेकरिता तीन गटात विभागणी करण्यात आली आहे. युवा गटात 18 वर्षे वयोगटातील स्पर्धक, वरिष्ठ गटात 18 ते 25 वर्ष वयोगटातील तर खुल्या गटात 25 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील स्पर्धकांचा समावेश आहे. प्रत्यक्षात उद्योगात रूपांतरित होऊ शकणाऱ्या नाविन्यपूर्ण संकल्पनांना व्यक्ती किंवा संस्थांनी या स्पर्धेमध्ये सहभागी करून घ्यायचे आहे. या स्पर्धेची ऑनलाइन नोंदणी 30 सप्टेंबर 2019 पर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतर गोंडवाना विद्यापीठाच्या तज्ञ समितीमार्फत या संकल्पनांची तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे यांनी दिली.

संकल्पनांचे सादरीकरण झाल्यानंतर स्पर्धेचे विजेते घोषित करण्यात येईल. या स्पर्धेत उत्कृष्ट व नाविन्य असणारे संकल्पनांना बेस्ट अवॉर्ड देऊन गौरवण्यात येणार आहे. तसे संकल्पना ज्या विभागाशी संबंधित असतील त्या विभागामार्फत 5 लाख रुपयापर्यंत कार्यादेश देण्यात येईल. त्यामुळे नवीन संकल्पना प्रत्यक्षात उतरण्यास मदत होईल. या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी हॅलोचांदा 155 398 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

या स्पर्धेचे अधिकृत उद्घाटन 13 सप्टेंबर 2019 रोजी प्रियदर्शिनी सभागृह, चंद्रपूर येथे होणार आहे. तसेच अभियांत्रिकी महाविद्यालयातील सीट्रिपलआयटी या केंद्राचे उद्घाटन होणार आहे. याप्रसंगी राज्याचे वित्त आणि नियोजन, वनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार तसेच भारताच्या सुपर कॉम्प्युटरचे जनक तथा उन्नत भारत अभियानाचे अध्यक्ष पद्मभूषण डॉ. विजय भटकर उपस्थित राहणार आहे. तरी या स्पर्धेचा जिल्ह्यातील युवकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाप्रशासनाच्या वतीने यावेळी करण्यात आले.

00000
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment