जावेद शेख/ प्रतिनिधी भद्रावती:-
भद्रावती तालुक्यातील पीपरी, जेना आणि पारोधी येथील लिलाव झालेल्या रेती घाटांची उपविभागीय अधिकारी (वरोरा) संदीप भस्के यांनी नुकतीच प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. पाहणीदरम्यान संबंधित घाटांवरील उत्खननाबाबत माहिती घेत पुढील आदेश मिळेपर्यंत उत्खनन थांबविण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती प्रशासनाच्या सूत्रांकडून मिळाली आहे.SDO Sandeep Bhaske's impact survey; Break on excavation at Pipri-Jena, Parodi sand ghats!
या वेळी घाट परिसरातील परिस्थिती, उत्खननाची पद्धत, नदीपात्राची स्थिती तसेच रेती वाहतुकीचे मार्ग यांचा आढावा घेण्यात आला. संबंधित ठेकेदार व कामगारांना पुढील आदेश मिळेपर्यंत कामकाज बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले. तसेच अनधिकृत वाहतूक रोखण्यासाठी काही संवेदनशील मार्गांवर रस्ते खोदून नाले तयार करण्याबाबतही सूचना देण्यात आल्याची माहिती आहे.
दरम्यान, चारगाव परिसरातील वर्धा नदी तसेच पारोधी परिसरातील ईरई नदी भागात रेती वाहतुकीबाबत चर्चा सुरू असल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत. याशिवाय ग्रामीण भागातील काही लहान नाल्यांमधूनही रेती उत्खनन होत असल्याची चर्चा स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या भागात प्रशासनाने अधिक लक्ष देऊन परिस्थितीची पाहणी करावी, अशी मागणी नागरिक व शेतकरी वर्गातून होत आहे.
विशेष म्हणजे मांगली नाला परिसरातही रेती उत्खननाच्या हालचाली होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. तसेच बंद असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या चारगाव घाटाकडेही प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. घाट बंद असल्याची माहिती असली तरी परिसरात काही हालचाली होत असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे. त्यामुळे या भागातही प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थिती स्पष्ट करावी, अशी नागरिकांची आर्त हाक आहे.
यापूर्वी भद्रावती तालुक्यात अवैध रेती वाहतूक रोखण्यासाठी महसूल विभागाच्या माध्यमातून विशेष भरारी पथक कार्यरत होते. या पथकाने विविध ठिकाणी तपासणी करून काही वाहनांवर कारवाईही केली होती. मात्र सध्या अशा प्रकारच्या कारवाया पूर्वीइतक्या दिसून येत नसल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे.
दरम्यान, वरोरा तालुक्यातील एका रेती घाटावर दोन गटांमध्ये झालेल्या वादातून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याची नोंद असून या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.
भविष्यात रेती उत्खनन व वाहतूक ही शासनाच्या नियम व पर्यावरणीय अटींच्या चौकटीतच करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश प्रशासनाने दिल्याचे समजते. तसेच बंद घाटांवर भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी प्रशासनाने वेळेतच लक्ष घालण्याची गरज असल्याचे नागरिकांचे मत आहे.
0 comments:
Post a Comment