मानवतेची भावना ठेवून पिकांचे पंचनामे करावेत: ना. मुनगंटीवार
लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या मतदतीसाठी सहकार्य करावे
अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत आढावा सभा
चंद्रपूर, दि. 2 नोव्हेंबर: सतत सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळावी याकरिता मानवतेची भावना ठेवून नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करावेत, असे निर्देश अर्थ, नियोजन, वनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. दिनांक 2 नोव्हेंबर 2019 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित आढावा सभेत ते बोलत होते.
चंद्रपूर जिल्ह्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना फार मोठा हादरा बसलेला आहे. कापूस, सोयाबीन, धान या मुख्य पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकरात लवकर देता यावी यासाठी राज्य सरकार आग्रही असून प्रशासनाने गतीने काम करावे. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यास कोणतीही हयगय करू नये. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी प्रत्येक शासकीय अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून काम करावे. पंचनामे करताना कोणतीही चूक होणार नाही याची दक्षता घ्यावी. काही अडचणी निर्माण झाल्यास त्या दूर करण्यास प्राधान्य दिले जाईल. परंतु विविध कारणे सांगून शेतकऱ्यांची अडवणूक करता कामा नये. शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करणे या कामाला प्राथमिकता द्यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
सोबतच प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा निधी शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्यासाठी प्रशासनाने ऑनलाइन प्रक्रियेमध्ये झालेल्या चुका लवकरात लवकर दुरुस्त कराव्यात. या कामाला गती देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा. जिल्हा प्रशासनाने या योजनेसंदर्भात लोकप्रतिनिधींना प्रशिक्षण द्यावे. यासाठी विशेष सभा आयोजित करावी. तसेच ही योजना प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी याकरिता किसान सन्मान पंधरवडा राबवल्या जाईल. तसेच केंद्र सरकार स्तरावर असलेल्या समस्या लवकरात लवकर सोडवल्या जाईल. परंतु उर्वरित शेतकऱ्यांपर्यंत या योजनेचा लाभ होण्यासाठी प्रशासन तसेच जिल्हा परिषद सभापती, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती व उपसभापती, पंचायत समिती सदस्य यांनी पुढाकार घ्यावा. या योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये चंद्रपूर जिल्ह्याला प्रथम क्रमांकाचा जिल्हा बनवण्यासाठी प्रत्येकाने आपले योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
या आढावा सभेला विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भोसले, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार,निवासी उपजिल्हाधिकारी घनश्याम भुगावकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील, जिल्हा परिषदेच्या कृषी सभापती अर्चनाताई जीवतोडे, समाज कल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, स्थायी समिती सभापती राहुल पावडे तसेच उपविभागीय अधिकारी,उपविभागीय कृषी अधिकारी, तहसीलदार, जिल्हा परिषदेचे सर्व सभापती, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती तसेच उपसभापती, तालुका कृषी अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment