मनपाच्या प्रभाग समितीच्या सभापतिपदी भाजपच्या छबू वैरागडे, खुशबू चौधरी आणि कांग्रेसचे अली अहमद मन्सूर यांची निवड
दिनचर्या न्युज
चंद्रपूर,:- ता. ५ : चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूरच्या प्रभाग समिती सभापतीपदाच्या निवडीसाठी गुरुवार ता. ५ ऑगस्ट रोजी मनपाच्या नवीन प्रशासकीय इमारतीत राणी हिराई सभागृहात पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली. यात प्रभाग समिती क्रमांक एकच्या सभापतिपदी छबू वैरागडे, प्रभाग दोनच्या सभापतिपदी खुशबू चौधरी आणि प्रभाग तीनच्या सभापतिपदी अली अहमद मन्सूर यांची निवड झाली.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम २९ अ-(४) अन्वये विभागीय आयुक्त, नागपूर विभाग नागपूरचे पत्र क्रमांक एमयुएन/१९/ (२) कावि- २०५/२०२१ दि. २६ जुलै २०२१ व पत्र क्रमांक एमयुएन/१९/(२) कावि- २०१६/ २०२१ दि. २ ऑगस्ट २०२१ अन्वये २०२१-२२ साठी चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूरच्या प्रभाग समिती क्रमांक एक, दोन आणि तीन मधील सदस्यांतून प्रभाग समिती सभापती यांची निवड करण्यासाठी कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता.
गुरुवारी, ता. ५ ऑगस्ट रोजी प्रभाग समिती सभापती यांची निवड करण्यासाठी विशेष सभा पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या अध्यक्षतेखाली, तर मनपाचे अतिरिक्त आयुक्त विपीन पालिवाल यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. प्रभाग समिती एकसाठी सकाळी ११ वाजता, प्रभाग समिती दोनसाठी दुपारी १२ वाजता, प्रभाग समिती तीनसाठी दुपारी १ वाजता सभा झाली. विशेष सभा सुरु झाल्यानंतर प्रभागनिहाय नामनिर्देशन पत्राची छानणी करण्यात अली. छाननीनंतर १५ मिनिटाच्या कालावधीत नामनिर्देशन पत्र मागे घेण्यासाठी मुदत देण्यात आली. प्रभाग समिती एकमधून भारतीय जनता पक्षाच्या छबूताई मनोज वैरागडे यांनी दोन अर्ज दाखल केले होते. त्यांच्या विरोधात प्रतिस्पर्धी उमेदवार नसल्याने छबूताई मनोज वैरागडे यांची सभापतिपदी अविरोध निवड करण्यात आली. प्रभाग समिती दोनमधून भारतीय जनता पक्षाच्या खुशबू अंकुश चौधरी यांनी देखील दोन अर्ज दाखल केले होते. त्यांच्या विरोधात प्रतिस्पर्धी उमेदवार नसल्याने खुशबू अंकुश चौधरी यांचीसुद्धा सभापतिपदी अविरोध निवड करण्यात आली.
प्रभाग समिती तीनमधून भारतीय जनता पक्षाचे सोपान गेनभाऊ वायकर व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अली अहमद मन्सूर यांनी नामांकन दाखल केले होते. त्यामुळे या पदासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार निवडणूक घेण्यात आली. यावेळी उपस्थित २० सदस्यांनी हात वर करून मतदान केले. यात दोन्ही उमेदवारांना समान म्हणजेच प्रत्येकी १०-१० मते प्राप्त झाली. त्यामुळे सोडत (ईश्वर चिठ्ठी) पद्धतीने निवड जाहीर करण्यात आली. यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अली अहमद मन्सूर विजय झाले.
0 comments:
Post a Comment