चंद्रपुर :-दि. 25 ऑक्टोबर 2021 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये नगरसेवक पप्पू देशमुख यांनी महानगरपालिकेतील पुन्हा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आणला.देशमुख यांनी मनपा प्रशासनाला पत्र देऊन 2017 पासून भाड्याने घेतलेल्या वाहनांबाबत माहिती मागितली होती. मनपातील अधिकारी व पदाधिकारी यांच्यासाठी भाड्याने घेतलेल्या वाहनाचे नोंदणी क्रमांक ,मालकाचे नाव,वाहनाचा परवाना इत्यादी माहिती देशमुख यांनी लेखी पत्र देऊन मागितली होती. या पत्राला उत्तर देताना मनपाचे अतिरिक्त आयुक्त यांनी अशा प्रकारची माहिती उपलब्ध नसल्याचे देशमुख यांना लेखी कळविले.
विशेष म्हणजे मागील चार वर्षात सहाय्यक आयुक्त व उपमहापौर यांच्यासाठी चार वाहने भाड्याने घेण्यात आली होती. दरवर्षी जवळपास वीस लाख रुपये या वाहनांच्या भाड्यापोटी अदा करण्यात आले.20 लाख रुपये दर वर्षी खर्च करून भाड्याने घेतलेल्या वाहनांबद्दल माहिती उपलब्ध नसल्याचे नगरसेवकांना लेखी देणे गंभीर बाब असल्याचे देशमुख यांनी महापौर राखी कंचर्लावार यांच्या निदर्शनास आणून दिले.
मागील आमसभेत पप्पू देशमुख यांनी जलमापके यंत्रे लावण्याची सुमारे 20 कोटी रुपयाचे कामात ई-निविदा प्रक्रिया न राबविता कंत्राटदाराला काम देण्याचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. याबाबत आयुक्त राजेश मोहिते यांनी दिलेले लेखी उत्तर दिशाभूल करणारे असल्याचा पुन्हा एकदा देशमुख यांनी पुराव्यानिशी आरोप केला.
जल मापक यंत्र लावण्याचे तसेच भाड्याने वाहन घेण्याच्या प्रकाराचे प्रकरण जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे चौकशीसाठी देण्यात यावे व दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी देशमुख यांनी केली. यावर सदर दोन्ही प्रकरण तपासून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याचे आश्वासन महापौर राखी कंचलवार यांनी देशमुख यांना दिले.
0 comments:
Post a Comment