नागभीड (प्रतिनिधी ):-जीवनात पुढे काय करणार आहोत हे आताच ठरवा व त्या ध्येयाच्या लक्षपुर्तीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा , यश तुमच्या दारात येईल असे जि.प.सदस्य संजय गजपुरे यांनी बोंड येथील स्वयंअर्थसहाय्यीत ग्रामीण वाचनालयाचे उद्घाटनप्रसंगी उपस्थित युवक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले तसेच आपली वाचनशक्ती या ग्रंथसंपदेच्या व शालेय पुस्तकांच्या माध्यमातुन वाढविण्याचे आवाहन केले. यावेळी नागभीड पं.स.च्या संवर्ग विकास अधिकारी कु.प्रणालीताई खोचरे यांची प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थिती होती.
नागभीड तालुक्यातील पारडी- मिंडाळा- बाळापुर जि.प.क्षेत्रातील बोंड येथील जि.प.उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या पुढाकाराने व गटशिक्षणाधिकारी प्रमोद नाट यांच्या मार्गदर्शनाखाली सदर वाचनालय सुरु करण्यात आले आहे. यासाठी संपूर्ण गावातून व परिसरातील गावांमधूनही लोकवर्गणी गोळा करण्यात आली आहे. यातुन विविध स्पर्धा परीक्षांसाठी तसेच नवोदय व स्कॅालरशिप परीक्षांसाठी आवश्यक पुस्तकांची खरेदी करण्यात आली आहे. उपसरपंच जगदीश पाटील राऊत व शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष विनोद तुपट यांनी गावात स्पर्धा परीक्षा केंद्र असावे या उदात्त व पवित्र हेतुने या वाचनालयाची सुरुवात होत असल्याचे स्पष्ट करून सर्व गावकऱ्यांनी यासाठी स्वयंस्फूर्तीने मदत करावी अशी विनंती केली.
दीपावलीच्या शुभमुहूर्तावर सुरु करण्यात आलेल्या या वाचनालयाच्या उद्घाटनप्रसंगी पं.स.सदस्या सौ.प्रणयाताई गड्डमवार व गटशिक्षणाधिकारी प्रमोद नाट यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी मंचावर बोंड ग्रामपंचायत चे उपसरपंच जगदीश पाटील राऊत , संत हरदास विद्यालय मिंडाळा चे संचालक अमर खंडाळे केंद्रप्रमुख प्रदिप मोटघरे , शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष विनोद तुपट , नवानगर चे मनोहर लोखंडे , बोंड चे डॅा. कऱ्हाडे यांची उपस्थिती होती .
याप्रसंगी प्रणालीताई खोचरे व प्रमोद नाट यांनी स्पर्धा परीक्षांसाठी करावयाच्या तयारी ची माहिती देत स्वानुभावाचे दाखले दिले व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी प्रोत्साहित केले. सदर वाचनालय सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत सुरु राहणार असुन युवक व विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेत आपले आयुष्य उज्वल करावे असे उपस्थित सर्वच अतिथींनी आवाहन केले. जि.प.सदस्य संजय गजपुरे यांनी या वाचनालयात स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांसाठी पाच हजार रुपयांची मदत जाहीर केली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता ८ वी ची विद्यार्थिनी कु.वैष्णवी देशमुख हिने केले तर आभार इयत्ता ८ वी ची विद्यार्थिनी कु.सुहानी राऊत हिने मानले. प्रास्ताविक जि.प.शाळा बोंड चे मुख्याध्यापक पि.के.जनबंधु यांनी केले. वाचनालय व कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आर.बी.ईरपाते , सौ.एम.एस.अनमुलवार , डी.बी.उईके व डी.टी.बनकर या शिक्षकवृंदांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला गावकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
===========================
0 comments:
Post a Comment