चंद्रपूर : शेतात जाणाऱ्या सांडपाण्याच्या चौकशीसाठी तक्रारकर्त्यांकडून पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या आठमुर्डी येथील ग्रामसेवकाविरूध्द चंद्रपूर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला. ही कारवाई सोमवार, २७ डिसेंबर रोजी वरोरा पंचायत समिती कार्यालयात करण्यात आली. लोकेश नामदेव शेंडे असे गुन्हा दाखल झालेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे.
आठमुर्डी येथील काही शेतकऱ्यांच्या शेतात सांडपाणी जात होते. या बाबतची तक्रार एका महिला शेतकऱ्याने सात महिन्यापूर्वी वरोरा उपविभागीय अधिकारी यांच्याकडे केली. त्यांनी ही तक्रार चौकशीसाठी तहसीलदार व संवर्धन विकास अधिकारी यांच्याकडे पाठविली. संवर्धन विकास अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश आठमोर्डी येथील ग्रामसेवक लोकेश शेंडे यांना दिले.
दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी लोकेश शेंडे याने तक्रारकर्त्या महिलेकडे पाच हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली. मात्र, तक्रारकर्त्या महिलेची लाच देण्याची इच्छा नसल्याने तिने चंद्रपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
तक्रारीवरून सोमवारी वरोरा पंचायत समिती येथे सापळा रचण्यात आला. तक्रारकर्त्या महिलेचा नातेवाईक लोकेश शेंडे याला पैसे देण्यासाठी गेला. मात्र, त्यांची हालचाल शेंडे याला संशायस्पद वाटल्याने त्याने पैसे स्वीकारण्यास नकार दिला. मात्र, लाचेची मागणी करणे हा गुन्हा असल्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामसेवक शेंडे याच्याविरूध्द गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली. ही कारवाई चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपविभागीय अधिकारी अविनाश भामरे यांच्या मागदर्शनाखाली अजय बागेकर, रोशन चांदेकर, रवी ढेंगळे, वैभव गाडगे, सतीश सिडाम यांनी केली.
0 comments:
Post a Comment