चंद्रपुर :-सरकारने दोन राष्ट्रीयकृत बॅंकाचे खाजगीकरण करण्याचा प्रयत्न सुरु केलेला आहे, त्यामुळे सर्व राष्ट्रीयकृत बॅंकेचे देशभरातील दहा लाख कर्मचारी अखेर रस्त्यावर उतरले.दि १६ आणि १७ डिसेंबरला बॅंक कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांचा संप पुकारला.हा दोन दिवसांचा संप संपूर्ण भारतात १०० टक्के यशस्वी झाला असून त्यामुळे करोडो रूपयांचे व्यवहार ठप्प पडले.
या पार्श्वभूमीवर चंद्रपुरात सुध्दा स्टेट बॅंक ऑफ इंडिया,चंद्रपूर शाखेसमोर विविध राष्ट्रीयकृत बॅंकेच्या कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शने केली आणि सरकारच्या या प्रस्तावाच्या विरोधात घोषणाबाजी केली.खाजगीकरणाच्या विरोधात ऑफिसर असोसिएशनचे चंद्रपूर क्षेत्राचे क्षेत्रीय सचिव कॉ.विजय धामणकर, एसबीआय स्टाफ युनियनचे क्षेत्रीय सचिव कॉ.दीपेन सोनी, तसेच स्टेट बॅंकेचे सेवानिवृत्त कॉ.सुनील जामदार,कॉ.सुरेश जुमडे,आदींची भाषणे झालीत.बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या संघटनेचे उपाध्यक्ष कॉ.महादेव कामतकर आणि क्षेत्रीय सचिव कॉ.कोरडे यांची प्रमुख उपस्थिती होती.शिवाय विविध शाखांच्या महिला कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त आणि उत्साही सहभाग यावेळी दिसून आला.
बरेचदा सरकार राष्ट्रीयकृत बॅंक कर्मचाऱ्यांच्या विरोधात निव्वळ अफवा पसरवून खाजगीकरण करणे कसे आवश्यक आहे, हे जनतेवर सारखे बिंबवत असतात.पण, खाजगीकरण कसे धोकादायक आहे आणि भविष्यात त्याचे काय दुष्परिणाम होतील याची जाणीव देशभरातील जनतेला करुन देण्यासाठी बॅंक कर्मचाऱ्यांनी अखेर संप करण्याचा मार्ग निवडला.संप केल्यामुळे बॅंक कर्मचाऱ्यांच्या पगारात दोन दिवसांच्या पगाराची कपात होणार आहे. बॅंकाचे खाजगीकरण झाल्यास सामान्य ग्राहक बॅंक सेवापासून वंचित राहण्याची दाट शक्यता आहे.कारण, खाजगी बॅंकेत खात्यात किमान रक्कम ठेवण्याची जी अट आहे , ती मोल मजूरी,कष्ट करणाऱ्या व्यक्तीच्या महिण्याला मिळणाऱ्या पगारापेक्षाही अधिक आहे.बॅंकेचे कामकाज फक्त धनाढ्य लोकांसाठी राहील.बॅंकेच्या विविध प्रकारच्या आकारण्यात येणाऱ्या खर्चामुळे सामान्य जनता होरपळून निघेल.छुपे शुल्क किती आणि केव्हा लावतील हे ही सांगता येणार नाही.बॅंकिंग सेवा अत्यंत महाग होईल.शेतकऱ्यांना कर्ज मिळण्याचे प्रमाण कमी होईल. सरकारी योजना फारशा राबविण्यात येणार नाही, त्यामुळे छोट्या उद्योगधंद्यांना कर्ज मिळणे कठीण होणार आहे.तसेच भविष्यात पुढील पिढीसाठी बॅंकेत नोकरी उपलब्ध राहण्याचे प्रमाण फारच अल्प असेल.
0 comments:
Post a Comment