भद्रावती ( जावेद शेख प्रतिनिधी) :
भद्रावती पोलिसांनी रविवारी (दि. ८ फेब्रुवारी २०२६) सकाळी मानोरा फाटा येथे नाकाबंदी दरम्यान गांज्यासह दोन युवकांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून सुमारे ३ किलो ११६ ग्रॅम गांज्यासदृश्य अंमली पदार्थ जप्त करण्यात आला असून एकूण १ लाख ६२ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
Police action in Manora Phata; Two arrested with 3 kg 116 grams of ganja
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर ते चंद्रपूर हायवेवरून लाल-काळ्या रंगाच्या होंडा शाईन (क्र. MH 40 CN 3966) दुचाकीवरून गांज्याची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती भद्रावती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मानोरा फाटा येथे नाकाबंदी करण्यात आली. दरम्यान वरोरा रोडकडून येणारी संशयित दुचाकी थांबवून तपासणी करण्यात आली.
चौकशीदरम्यान आरोपींनी आपली नावे हर्षल राजेंद्र रक्षित (वय २४, रा. पंचशील नगर, काटोल, जि. नागपूर) व अंशुमन रवींद्र विर (वय २४, रा. येनवा, ता. काटोल, जि. नागपूर) अशी सांगितली. आरोपी अंशुमन विर याच्या ताब्यातील काळ्या रंगाच्या बॅगेची पंचासमक्ष झडती घेतली असता त्यात ३ किलो ११६ ग्रॅम गांज्यासदृश्य पदार्थ आढळून आला.
पोलिसांनी गांजा (किंमत ₹६२,३२०), दुचाकी (₹७०,०००) व दोन अँड्रॉईड मोबाईल (₹३०,०००) असा एकूण ₹१,६२,३२० किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, मा. अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी, सपोनि संजय मिश्रा, सपोनि मोहन धोंगडे, पोउपनि संतोष केदार तसेच गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहेत.
0 comments:
Post a Comment