भद्रावती,दि.२९(तालुका प्रतिनिधी):-
आमच्या गावाचे पुनर्वसन करा अन्यथा आत्महत्येचा मार्ग पत्करु,असा इशारा भद्रावती तालुक्यातील चेकबरांज येथील रहिवासी व ग्राम पंचायत सदस्या गिरीजाबाई पानघाटे यांनी पत्रपरिषदेत दिला.
गिरीजाबाई पानघाटे यांनी पत्रपरिषदेत सांगितले की, मागील २० वर्षांपासून कर्नाटका एम्टा कंपनीकडून तालुक्यातील बरांज (मो.) येथील कोळसा उत्खननाचे काम चालू आहे. या खदानीकरीता बरांज (मो.),चेकबरांज आणि परिसरातील जमीन अधिग्रहित करण्यात आली. परंतु अजुनपर्यंत आमच्या गावाचे पुनर्वसन करण्यात आले नाही. आमच्या मुलांना नोक-या देण्यात आल्या नाही. सेक्शन ४ लावल्यामुळे आम्हाला आमच्याच जागेवर घर बांधायला परवानगी मिळत नाही.बॅंकांकडे कर्ज मागायला गेले असता बॅंका कर्ज द्यायला तयार नाहीत. घरकुल योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. खदानीतील स्फोटांमुळे घराला हादरे बसत आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आमच्या समस्या त्वरित सोडविण्यात याव्यात अन्यथा आत्महत्येचा मार्ग पत्करावा लागेल असा इशाराही गिरीजाबाई पानघाटे यांनी पत्रपरिषदेत दिला. तसेच
५० वर्षांपासून आम्ही रहिवासी असून आमच्या घराला अवार्ड लावण्यात आले नाही, असे अनुसया सातपुते या वृद्ध महिलेने यावेळी सांगितले.
पत्रपरिषदेला सत्यफुला राऊत आणि माजी ग्रामपंचायत सदस्या स्वीटी रामटेके उपस्थित होत्या.
0 comments:
Post a Comment