कोरपना :-कोरपना तालुक्यातील नारंडा येथील दालमिया सिमेंट कंपनीत पूर्वाश्रमीचे मुरली सिमेंट कर्मचारी, पूर्वाश्रमीचे कंत्राटी कामगार तसेच दत्तक गावातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना दालमिया सिमेंट कंपनीत नोकरीवर सामावून घ्यावे, या प्रमुख मागणीकरिता दालमिया सिमेंट कंपनी समोर महाधरणे आंदोलन सुरू केले होते. अखेर एक महिना चार दिवसानंतर मनसे प्रणित मराठी कामगार सेनेच्या या धरणे आंदोलनाला यश आले आहे. आंदोलकांच्या मागण्या कंपनी प्रशासनाने मान्य केल्या आहेत.
नारंडा येथील मुरली सिमेंट कारखाना बंद झाल्यानंतर तो कारखाना दालमिया भारत सिमेंट ग्रुप ने टेक ओव्हर केला. सिमेंट कारखाना टेक ओव्हर करत असताना पूर्वाश्रमीचे मुरली कर्मचारी व कंत्राटी कामगारांना दालमिया सिमेंट कंपनीत सामावून घेण्याच्या स्पष्ट सूचना एन.सी.ए.एल.टी कोर्टाच्या असूनही दालमिया सिमेंट कंपनी प्रशासनाने काही पूर्व मुरली कर्मचाऱ्यांना, कंत्राटी कामगारांना नोकरीत सामावून घेतले नाही. त्यांच्या ऐवजी नवीन कामगारांना कामावर घेतले. त्यामुळे मुरली कामगारांमध्ये रोष होता. त्याचबरोबर कंपनीचे प्रदूषण सहन करणाऱ्या दालमिया सिमेंट कंपनीने दत्तक घेतलेल्या सात गावांपैकी कमीत कमी युवकांना कंपनीने कामावर घेतले व जास्तीत जास्त चंद्रपूर, वरोरा व इतर गावातील लोकांना रोजगार दिला. म्हणून दत्तक गावातील ग्रामस्थ देखील दालमिया कंपनी प्रशासनावर नाराज होते. वारंवार निवेदन देऊन, आंदोलन करून देखील दालमिया सिमेंट कंपनी प्रशासन दखल घेत नव्हते. याची तक्रार पूर्व मुरली कामगारांनी मनसे नगरसेवक सचिन भोयर यांच्याकडे केली. यानंतर याकडे कंपनीचे लक्ष वेधण्यात आले. परंतु कुठलीही कार्यवाही न झाल्याने 10 नोव्हेंबर पासून मनसे प्रणित मराठी कामगार सेनेच्या वतीने पूर्व मुरली कामगारांच्या मागण्यां करिता मनसेचे आंदोलन सुरू केले.
..चौकट..
अखेर प्रशासनाने दखल घेतली
या आंदोलनाला कामगारांचा, ग्रामस्थांचा स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद लाभल्यामुळे कंपनीचे कामकाज दहा दिवस ठप्प होते. जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी काही कामगारांनी सात दिवस अन्नत्याग आंदोलनही केले. प्रकृती खालावल्यामुळे पोलीस प्रशासनाने जबरदस्तीने अन्नत्याग करणाऱ्या आंदोलकांना उचलून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. अखेर जिल्हा प्रशासनाला मनसेच्या महाधरणे आंदोलनाची दखल घ्यावी लागली.
..चौकट..
संयुक्त बैठक बोलावली
30 नोव्हेंबरला कोरपना तहसीलदार यांच्या दालनात राजुरा उपविभागीय अधिकारी संपत खलाटे यांच्या अध्यक्षतेखाली कामगार प्रतिनिधी व कंपनी प्रतिनिधी यांची आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी संयुक्त बैठक लावण्यात आली. या बैठकीत दालमिया कंपनी प्रशासनाच्या वतीने एच.आर उमेश कोल्हटकर व सिनियर मॅनेजर पराग पानपट्टीवर उपस्थित होते. कामगार प्रतिनिधी म्हणून नगरसेवक सचिन भोयर, प्रकाश बोरकर, सुरेश कांबळे, महालिंग कंठाळे उपस्थित होते. या बैठकीदरम्यान झालेल्या चर्चेत पूर्व मुरली परमनंट कामगारांना तसेच पूर्व कंत्राटी कामगारांना त्यांच्या स्कील नुसार कंपनीच्या नियुक्ती कार्यपद्धतीनुसार आवश्यकतेनुसार कंत्राटदार व ओ अंड एम मार्फत सदर कामगारांना कामावर समाविष्ट करण्यास कंपनी प्रशासनाने मान्य केले.
..चौकट..
स्थानिकांना मिळणार प्राधान्य
यावेळी स्थानिक गावातील युवकांना प्राधान्य देण्यात येईल, असे कंपनी प्रशासनाने सांगितले. या बैठकीचे सुधारित इतिवृत्त 14 डिसेंबरला नायब तहसीलदार प्रवीण चिडे यांनी आंदोलनस्थळी आंदोलकांना आणून दिल्यावर व वाचन करून दाखवल्यावर सर्वानुमते आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनाच्या यशस्वितेकरिता महाराष्ट्र सैनिकांनी, कामगारांनी, ग्रामस्थांनी व महिला वर्गांनी मेहनत घेतली.
0 comments:
Post a Comment