भद्रावती,दि.२२(तालुका प्रतिनिधी):-
येथील आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त ग्रामोदय संघाचे उपाध्यक्ष विजय चंद्रप्रकाश श्रीवास्तव यांना जर्मनी येथील इंटरनॅशनल पीस युनिव्हर्सिटीने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना ' डॉक्टर ऑफ सिरॅमिक सायंस ' ही मानद डाॅक्टरेट पदवी बहाल करुन सन्मानित केले.
श्री. श्रीवास्तव हे मागील ५० वर्षांपासून ग्रामोदय संघात कार्यरत असून ते ग्रामोदय संघाचे पदाधिकारी राहिले आहेत. बरीच वर्षे त्यांनी ग्रामोदय संघाचे सचिव म्हणून यशस्वीपणे जबाबदारी पार पाडली आहे. सध्या ते उपाध्यक्ष म्हणून पदाधिकारी आहेत. ग्रामोदय संघाच्या प्रगतीत त्यांचा मोलाचा वाटा आहे.
त्यांनी लिहिलेल्या 'एनसायक्लोपिडिया ऑफ इंडियन माॅडर्न पाॅटरी ' या पुस्तकाबद्दल त्यांना जर्मनीतील विद्यापीठाने डॉक्टरेट बहाल केली. ४०० पानांचे हे पुस्तक सन २०१९ मध्ये लिहून पूर्ण झाले. आज ते विक्रीकरिता ऑनलाईन उपलब्ध आहे. हे पुस्तक लिहिण्याकरिता त्यांना ग्रामोदय संघाचे संस्थापक स्व.कृष्णमूर्ती मिरमिरा यांची प्रेरणा मिळाली. तर कलकत्ता येथील सिरॅमिक सेंटरचे सायंटिस्ट इंचार्ज सपनकुमार दास यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
त्यांनी सिरॅमिक क्षेत्रात विविध संशोधने केले असून आठ हस्तपुस्तिका लिहिल्या आहेत. त्यांना मानद डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल त्यांचे ग्रामोदय संघाचे अध्यक्ष जितेंद्रकुमार चौधरी, सचिव अय्युब हुसेन, शामराव ठाकरे, रमेश गाडेकर, रवींद्र गौरकार, चंद्रकांत पोईनकर यांनी अभिनंदन केले आहे.
0 comments:
Post a Comment