चंद्रपुर :-स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करावे, यासाठी संपूर्ण विदर्भात जनजागरण करून, विदर्भाचे ज्वलंत प्रश्न सोडविण्यासाठी 'विदर्भ मिळवू औंदा' या भूमिकेप्रमाणे नागपूर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दिनांक 28 फेब्रुवारीला व्हेरायटी चौकात मानवी शृंखला करून विदर्भ राज्य आंदोलन समिती आंदोलनाचा बिगुल फुकणार आहे. घटनेच्या कलम प्रमाणे राज्य निर्मितीचा अधिकार केंद्र सरकार व संसदेचा असल्यामुळे पहिल्यांदा दिनांक 11मार्च 2022ला केंद्र सरकारच्या नागपूर येथील सेमिनरी हिल्स कार्यालय संकुलासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. ही स्वतंत्र विदर्भाची मागणी प्रभावीपणे राज्यकर्त्यांपुढे मांडण्यासाठी संसदेच्या अर्थसंकल्पीय काळातदिनांक 7 एप्रिल 2022 रोजी जंतरमंतरवरून संसदेवर हल्लाबोल करण्याची घोषणा करण्यात येणार आहे.अशी माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य नेते माजी आ.ऍड वामनराव चटप यांनी रविवार(13 फेब्रुवारी)ला पत्रपरिषदेत दिली.
यावेळी वि.रा.आ.समितीचे प्रकाश पोहरे,अरुण केदार,ऍड मोरेश्वर टेंभुर्डे,प्रभाकर कोंडबतुंवार,रंजना मामर्डे,डॉ गजभे,मुकेश मासुरकर,किशोर दहेकर,सुदामा राठोड आदींची उपस्थिती होती.
ऍड चटप म्हणाले,स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरु झालेल्या स्वतंत्र विदर्भाच्या चळवळीला 115 वर्षे लोटली आहेत. स्वतंत्र विदर्भ राज्य करावे या संबंधात जेवढे आयोग व समित्या झाल्या या सर्वांचे अहवाल एकमुखाने स्वतंत्र विदर्भ राज्य सक्षम राज्य होऊ शकते म्हणुन निर्मिती व्हावी याच बाजूचे आहे. भारतीय जनता पक्ष आणि कॉंग्रेस या प्रमुख पक्षांनी स्वतंत्र विदर्भ निर्माण व्हावे असे ठराव केले आहेत. हे सर्व अनुकूल असतांना आणि देशात अन्य राज्यांची निर्मिती झाली असताना मग विदर्भाचे स्वतंत्र राज्य देण्यास देशाची सत्ता सांभाळलेल्या प्रमुख पक्षांची उदासीनता का आहे ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला .
सर्व राजकिय पक्षांनी आपनी पाळी भाजून सत्तेवर येण्यासाठी विदर्भातील भोळ्या जनतेचा वापर करून घेतला.असा आरोप त्यांनी केला.
ज्या प्रमुख राजकीय पक्षाचा राजकीय प्रभाव कमी होतो. तो पक्ष विदर्भाचा मुद्दा मोठा गाजावाजा करून उचलून धरतो आणि सत्तेवर येताच स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा अडगळीत टाकतो. भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी विदर्भाची घोर फसवणूक केली आहे. शिवसेनेला पश्चिम महाराष्ट्र व मुंबईच्या भरोश्यावर विदर्भावर राज्य करायचे आहे. म्हणून मराठी एक राज्य राहावे, अशी बेगडी साद घालत विरोध करतात.असा गौप्यस्फोट त्यांनी केला.
विदर्भातील जनता जागरूक झाली असून विदर्भाच्या सर्व जिल्हयात हा स्वतंत्र विदर्भाचा विचार त्यामागील उदिष्टे आणि विदर्भ झाल्यास होणारी समस्याची सोडवणूक व होणारे फायदे यासंदर्भात सविस्तर जनजागृती करण्यात येणार आहे. हे स्वतंत्र विदर्भासाठी एल्गार पुकारण्याचे वर्षे आहे, अशी घोषणा समितीने केली आहे.असे चटप म्हणाले.
*विदर्भ होऊ शकतो सुजलाम सुफलाम...*
विदर्भाचे स्वतंत्र राज्य या मागणीमागे जसा राजकियदृष्ट्या दुर्लक्षित केल्याचा इतिहास आहे. तसाच आतापर्यंत झालेल्या प्रचंड लुटीची काळी बाजू आहे. नागपूर करार करून येथील जनतेची सहमती न घेता महाराष्ट्रात सामील करून घेतले, तेव्हापासुन अन्यायाची मालिका सुरू झाली. नागपूर करारानुसार नोकरी, सिंचन, वीज व अन्य विकासकामांसाठी निधी या सर्व बाबतीत लोकसंख्येनुसार 23टक्के देण्याचे अभिवचन केव्हाच पायदळी तुडवून टाकण्यात आले.विदर्भाच्या वाट्याला फक्त अन्यायच आला. येथे गरीबी, दारिद्रय शेतकरी आत्महत्या, कुपोषण, बेरोजगारी, नक्षलवाद, प्रदूषण, बालमृत्यू, विज व सिंचन अनुशेष असेअनेक प्रश्न मोठ्या स्वरुपात उभे राहिले. सुपीक जमीन, वन, पाणी, खनिज हे सर्व असतांना लोकांचे दरडोई उत्पन्न घटले आणि पाश्चिम महाराष्ट्राने पद्धतशीर पणे विदर्भाची लूट केली. आलातर महाराष्ट्र कर्जाच्या खाईत लोटला असल्याने या राज्यात राहून विदर्भाचा विकास कधीही शक्य नाही, त्यामुळे विदर्भाचे स्वतंत्र राज्य होऊन चार वर्षात विदर्भ सुजलाम सुफलाम होईल अशा अर्थसंकल्पाची मांडणी आंदोलन समितीने केली आहे.अशी माहिती ऍड चटप यांनी दिली.
0 comments:
Post a Comment