चंद्रपूर :- मागील आठ दिवसांपासून चंद्रपूर शहराच्या वडगाव प्रभागात रात्रीच्या सुमारास अस्वलाचे दर्शन होत आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारची जीवीतहाणी होण्यापूर्वीच त्या अस्वलीला तीन दिवसांत जेरबंद करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नगरसेवक पप्पू देशमुख यांनी चंद्रपूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक एन.आर.प्रविण यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
दुर्गापूर परिसरात वाघ व बिबट्याने हल्ला करुन दोघांना ठार केले आहे. एक वाघ जेरबंद केला असला तरी काही वाघ चंद्रपूर शहराकडे आगेकूच करीत असल्याचे चित्र आहे. दरम्यान मागील आठ दिवसांपासून वडगाव प्रभागातील आंबेडकर सभागृह, साईनगर, लक्ष्मीनगर, जुनी वस्ती वडगाव, शिवनगर आदी परिसरातील अनेक नागरिकांना रात्री अस्वलाचे दर्शन झाले आहे. तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अस्वल फिरत असल्याचे कैद झाले आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना या अस्वलीपासून धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा धोका होण्यापूर्वीच अस्वल पकडण्यासाठी ठोस उपाययोजना करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा, नगरसेवक पप्पू देशमुख यांनी मुख्य वनसंरक्षकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. यावेळी जनविकास सेनेचे घनश्याम येरगुडे,मनिषा बोबडे,आकाश लोडे,प्रफुल बैरम,गितेश शेंडे यांची उपस्थिती होती.
हवेली परिसरात वाघाचे दर्शन?
हवेली गार्डन परिसरामध्ये वाघाचे दर्शन झाल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. परिणामी नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. त्यामुळे वनविभागाच्या पथकाने या परिसरात गस्त घालून सत्यता पडताळावी वाघ असल्यास त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणीही निवेदनातून केली आहे.
0 comments:
Post a Comment