Ads

विद्यूत मंडळाने शेतक-यांना २४ तास अखंडीत विजेचा पुरवठा करावा -अ.भा.ग्राहक पंचायतची मागणी

चंद्रपूर प्रतिनिधी:-शेतामध्ये कृषी पंपाकरीता व अन्य शेतीच्या कामाकरीता नियमित विज पुरवठा नसल्यामुळे शेतकरी हवालदील झाला असून आत्महत्या सारखे पाऊल उचलत आहे तेव्हा विद्यूत मंडळाने शेतक-यांना २४ तास अखंडीत विजेचा पुरवठा करावा अशी आग्रहाची मागणी १५ मार्च जागतिक ग्राहक दिनाच्या निमित्याने अ.भा.ग्राहक पंचायत महाराष्ट्र व गोवा राज्याचे पश्चिम क्षेत्रीय संघटन मंत्री गजानन पांडे यांनी केली आहे .
श्री पांडे पुढे म्हणाले की, विद्यूत मंडळ कुठल्याही उद्योगाला २४ तास अखंडीत विजेचा पुरवठा करते, परंतु शेतक-यांना आठवडयातून तीन दिवस दिवसा तीन-चार तास व चार दिवस रात्री चार-पाच तास विजेचा पुरवठा करते तो ही खंडीत केलेला.हा सरकारचा भेदभाव असून शेतक-यांवर वारंवार अन्याय करणारा आहे. जो शेतकरी रात्रंदिवस मेहनत मजदुरी करुन अन्नधान्य पिकवितो त्यांचेवर सतत अन्याय केल्या जातो व उद्योगधंदेवाल्यांसमोर लाल कारपेट अंथरले जाते हा भेदभाव कां ? असा सवालही ग्राहक पंचायतने उपस्थित केला आहे.

उद्योगधंदेवाल्यांकडे लाखो रुपये थकीत असतांना त्यांचेवर मेहेरबाणी केली जाते, परंतु गरिब शेतक-यांकडे हजार रुपयांची जरी थकबाकी असेल तर त्यांची लगेच वीज कापल्या जाते व त्यांना रस्त्यांवर आणल्या जाते. त्या गरीब शेतक-यांना रस्त्यांवर उतरुन आंदोलन करावे लागते याकडे लक्ष वेधून हे आता खपवून घेतले जाणार नाही असा इशाराही अ.भा. ग्राहक पंचायतने दिला आहे.

या मोठया उद्योगधंदेवाल्यांकडे असलेल्या लाखोंच्या थकबाकी बाबत अ.भा.ग्राहक पंचायत नागपूर यांनी एक जनहित याचिका दाखल केली होती व थकबाकी वसूल करण्याबाबत विद्यूत मंडळाला एकप्रकारे मदत केली होती याकडेही ग्राहक पंचायतने लक्ष वेधले आहे.

शेतक-यांना ब-याच सरकारी योजनांवर सरकारी अनुदान दिल्या जाते. तर ८०- ९० टक्के अनुदान दिल्याची प्रसिध्दी केल्या जाते परंतु प्रत्यक्षात ५० टक्केच अनुदान शेतक-यांच्या खाती जमा होते याकडेही ग्राहक पंचायतने लक्ष वेधून जेवढे अनुदान जाहीर केले जाते ते १०० टक्के अनुदानाची रक्कम शेतक-यांच्या खात्यात जमा करावी अशी मागणीही गजानन पांडे यांनी केली आहे.

शेतक-यांचे निसर्गामुळे वारंवार होणारे पिकांचे नुकसान, अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे वारंवार होणारे पिकांचे, फळांचे नुकसानीबाबत महाराष्ट्र सरकारतर्फे नुकसान भरपाईबाबत बांधावर येवून फक्त घोषणा केल्या जातात परंतु प्रत्यक्षात शेतक-यांना नुकसान भरपाई मिळत नाही ही शोकांतिका असून याकडेही लक्ष वेधून केलेल्या घोषणांची प्रत्यक्षात १०० टक्के अंमलबजावणी करुन शेतक-यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणीही अ.भा.ग्राहक पंचायतचे पश्चिम क्षेत्रीय संघटन मंत्री गजानन पांडे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

उपरोक्त याच मागण्यांचा पाठपुरावा करीत चंद्रपूर जिल्ह्यातील वीज उत्पादनामुळे जिल्ह्यातील जनतेला दुषीत पर्यावरणामुळे विविध आजारांचा सामना करावा लागतो, जेव्हा की इथली वीज बाहेर पाठविली जाते मात्र जिल्ह्यातील जनतेकडून इंधन अधिभारासहीत विविध शुल्क वसूल केले जाते ते शुल्क माफ करुन या जिल्ह्यातील जनतेला स्वस्त दरात वीज उपलब्ध करून देण्यात यावी व या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोफत व अखंडीत वीज उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी चंद्रपूर जिल्हा ग्राहक पंचायत चे जिल्हा संघटक दीपक देशपांडे यांनी केली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment