Ads

नागभीड तालुक्यातील शेतबोड्यांचे अडलेले अनुदान मिळणार

नागभीड :- तालुका कृषी कार्यालयाकडून २०१८-१९ आणि २०१९-२० या आर्थिक वर्षात नागभीड तालुक्यात एकुण ३७ शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात शेतबोड्या खोदून देण्यात आल्या. तालुक्यात धान पीक अंतिम टप्प्यात असतांना पाऊस नेमका याचवेळी दडी मारतो आणि हातातोंडाशी आलेले धानपीक नेस्तनाबूत होते. अशावेळी या शेतबोड्यातील पाणी या धानपिकास कामी यावे या उद्देशाने या शेतबोड्या खोदून देण्यात आल्या आहेत. शेतबोड्यांचे अनुदान २७ हजार ५०० रुपये तर काही शेतबोड्यांचे अनुदान ३८ हजार ९०० रुपये असल्याची माहिती आहे.
शेतबोड्या खोदुन अडीच वर्षाहुन अधिक कालावधी होत असला तरी अद्यापही या शेतकऱ्यांना अनुदान प्राप्त झाले नाही. या अनुदानासाठी संबंधित शेतकरी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या पायऱ्या झिजवित आहेत. यापैकी ४ जणांना अनुदान प्राप्त झाले असुन उर्वरित ३३ शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडत आहे. या शेतबोड्या खोदण्यासाठी काही शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर तर काही शेतकऱ्यांनी जेसीबी मशीन भाड्याने घेतली होती. आता हे मशीन मालक शेतकऱ्यांना पैशाची वारंवार विचारणा करीत असल्याने आधीच नापीकीमुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या या शेतकऱ्यांसमोर संकट उभे झाले आहे .
हे अनुदान शासनाने संबंधित विभागाकडे पाठविल्याची माहिती आहे , मात्र ते अद्यापही शेतकऱ्यांना मिळाले नाही. मग हे अनुदान अडले कुठे आहे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. कुनघाडा चक येथील मारोती वारजुकर यांचा तर या यादीतुन नावच गहाळ असल्याची माहिती समोर आली आहे . याबाबतची माहिती या शेतकऱ्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी व वर्तमानपत्रात दिली. चंद्रपूर-वर्धा - गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्थेचे विधानपरिषद सदस्य आमदार डॉ. रामदासजी आंबटकर यांनी याची दखल घेत तारांकित प्रश्नाद्वारे शासनाला माहिती विचारली.
मुंबई येथे सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार डॉ. रामदासजी आंबटकर यांनी गहाळ शेतकऱ्यांच्या नावासह शेतबोड्यांच्या थकित अनुदानाचा प्रश्न उपस्थित केला. आमदार डॉ. आंबटकर यांच्या या तारांकित प्रश्नावर विधानपरिषद सभागृहात राज्याचे रोहयो तथा फलोत्पादन मंत्री नाम.संदीपान भुमरे यांनी सदर प्रकरणी प्रलंबित शेतकऱ्यांचे थकित अनुदान ३१ मार्च २०२२ पुर्वी देण्याचे आश्वासन दिले. यामुळे या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असुन शेतकऱ्यांच्या थकित अनुदानाचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल भाजपा जिल्हा महामंत्री संजय गजपुरे , तालुका अध्यक्ष संतोष रडके , नागभीड कृऊबास सभापती अवेश पठाण , उपसभापती रमेश पाटील बोरकर , माजी तालुका अध्यक्ष होमदेव मेश्राम , ज्येष्ठ नेते वामनराव तलमले , नागभीड न.प.उपाध्यक्ष गणेश तर्वेकर यांनी शेतकऱ्यांच्या वतीने आमदार डॉ. रामदासजी आंबटकर यांचे आभार मानले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment